संयुक्त रिपब्लिकन आघाडीचा प्रयोग राज्यभरात करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 07:54 PM2022-03-30T19:54:13+5:302022-03-30T19:54:40+5:30

Nagpur News नागपूरच्या धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा संयुक्त रिपब्लिकन आघाडीचा प्रयोग राबविण्यात येईल अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

The United Republican Front will experiment across the state | संयुक्त रिपब्लिकन आघाडीचा प्रयोग राज्यभरात करणार

संयुक्त रिपब्लिकन आघाडीचा प्रयोग राज्यभरात करणार

Next
ठळक मुद्देनागपूर प्रमाणे अमरावती, अकोल्यात चांगला प्रतिसाद

नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नागपूरच्या धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा संयुक्त रिपब्लिकन आघाडीचा प्रयोग राबविण्यात येईल. या आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून अमरावती व अकोला येथे यासंदर्भात प्राथमिक स्तरावरील बैठकही पार पडली असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

पीरिपाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी रविभवन येथे पार पडली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे सुद्धा यावेळी उपस्थित होते. प्रा. कवाडे म्हणाले. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी एकत्र येऊन नागपुरात संयुक्त रिपब्लिकन आघाडी स्थापन केली असून ही आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आल्याने या आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सध्या ७५ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरातील दोन-दोन मंत्री असताना अंबाझरी येथील आंबेडकर सभागृह पाडण्यात कसे आले ? असा प्रश्न उपस्थित करीत ते भवन लवकरात लवकर कसे निर्माण वहोईल, याकडे या मंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आमची आठवण येते. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते छोट्या पक्षांची उपेक्षा करीत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

पत्रकार परिषदेत कैलास बोंबले, कपिल लिंगायत, बाळूमामा कोसमकर, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

- एक वॉर्ड एक नगरसेवक पद्धतीच असावी

मुंबईत वॉर्ड पद्धती असताना राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये प्रभाग पद्धत का ? हा भेदभाव आहे. आघाडी सरकारला महाराष्ट्रापेक्षा मुंबई प्रिय वाटते का? असा प्रश्नही प्रा. कवाडे यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबई प्रमाणेच राज्यभरातील शहरांमध्ये वॉर्ड पद्धत असावी. एक वॉर्ड एक नगरसेवक ही जुनी पद्धत पुन्हा अवलंबिण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Web Title: The United Republican Front will experiment across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.