विद्यापीठाने वर्धा, गोंदिया, भंडारातही करावे उपकेंद्र, सिनेट सदस्यांची मागणी
By निशांत वानखेडे | Published: October 31, 2023 05:46 PM2023-10-31T17:46:06+5:302023-10-31T17:46:55+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यातील व मध्य भारतातील जुने व ऐतिहासिक महत्व असलेले विद्यापीठ आहे.
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अंतर्गत येणाऱ्या भंडारा, गाेंदिया व वर्धा या तीन जिल्ह्यात विद्यापीठाचे उपकेंद्र निर्माण करावे, अशी मागणी काही सिनेट सदस्यांनी विद्यापीठाला केली असल्याची माहिती आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यातील व मध्य भारतातील जुने व ऐतिहासिक महत्व असलेले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १९२३ मध्ये झाली. २००५ साली महाराष्ट्र शासनाने या विद्यापीठाचे नामकरण ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ' असे केले. १९४८ साली विद्यापीठामधून सागर विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर १ मे १९८३ ला नागपूर विद्यापीठामधून अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली. त्यावेळी विदर्भाच्या आठ जिल्ह्यांपैकी चार जिल्हे अमरावती विद्यापीठाकडे गेले.
२ ऑक्टोंबर २०११ गोंडवाना विद्यापीठ हे विद्यापीठापासून वेगळे झाले. आता पुन्हा लक्ष्मीनारायण अभिमत तंत्र विद्यापीठ हे नागपूर विद्यापीठापासून स्वतंत्र झाले आहे. अशा स्थितीत भौगोलिक दृष्टीने विद्यापीठाचा विस्तार कमी झाला. सध्या नागपूर विद्यापीठात वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर या चार जिल्ह्याचा परिसर आहे. मात्र विद्यापीठाकडे एकही उपकेंद्र नाही. अशा परिस्थितीत वर्धा, भंडारा गोंदिया मध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र तयार करण्यात मागणी परत एकदा जोर पकडू लागली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना लहान सहान गोष्टीसाठी नागपुरात यावे लागते. जर तीन जिल्ह्यात उपकेंद्र तयार झाले तर तेथूनच आवश्यक कामाचा निपटारा करता येईल. शिवाय नागपूर मध्ये येण्याची गरज वारंवार राहणार नाही. याविषयी सिनेट सदस्यांनी गोंदिया, भंडारा, वर्धा येथे उपकेंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे.
प्रत्येक कामाकरीता यावे लागते नागपूरला
गोंदिया, वर्धा, भंडाराचे विद्यार्थ्यांना इमिग्रेशन, तात्पुरते पदवी प्रमाणपत्र, दुय्यम गुणपत्रिका, दुय्यम पदवी, माध्यम प्रमाणपत्र, पात्रता प्रमाणपत्र, ट्रान्सस्क्रिप्ट, नाव बदलण्याबाबत अधिसूचना, गुणपत्रिका/पदवी पदवी पडताळणी प्रमाणपत्र, निकाल घोषित झालेल्या तारखेचे प्रमाणपत्र, विथर्ड निकाल इत्यादी साठी नागपुरात यावे लागते. यामुळे कागदपत्रासाठी खर्च कमी पण नागपुरात येण्यासाठी खर्च जास्त, वेळेचा अपव्यवय आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे उपकेंद्र प्रत्येक जिल्ह्यात तयार झाले तर विद्यार्थ्यांच्या वेळ, पैसा यांची बचत होऊ शकते. या तिन्ही जिल्ह्यात विद्यापीठाचे ग्रंथालय तयार करण्याच्या मागणीचा प्रस्ताव सिनेट सदस्य रोशनी खेलकर यांनी विद्यापीठास सादर केला आहे.