अपघात टाळण्यासाठी आता ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा वापर; देशातील पहिला प्रयोग नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 08:30 IST2022-05-26T08:30:00+5:302022-05-26T08:30:01+5:30
Nagpur News रस्ते अपघात टाळण्यासाठी जगभरात तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून भारतात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ची मदत घेण्यात येणार आहे.

अपघात टाळण्यासाठी आता ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा वापर; देशातील पहिला प्रयोग नागपुरात
नागपूर : रस्ते अपघात टाळण्यासाठी जगभरात तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून भारतात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ची मदत घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील ‘आय-रस्ते’ प्रकल्पाचा पहिला प्रयोग नागपुरात राबविण्यात येणार आहे. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून रस्त्यावरील धोके अगोदर ओळखता येतील व चालकांना वेळेत त्याची सूचना जाईल, असा दावा करण्यात येत आहे.
‘आय-रस्ते’च्या माध्यमातून (इंटेलिजं सोल्युशन्स फॉर रोड सेफ्टी थ्रू टेक्नॉलॉजी ॲण्ड इंजिनीअरिंग) अपघातासाठी संभाव्य कारणीभूत परिस्थिती ओळखता येईल व ‘एडीएएस’च्या (ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम) मदतीने चालकांना सतर्क करण्यात येईल. याशिवाय, संपूर्ण मार्गावरील जोखमींचे सतत निरीक्षण करून डाटा विश्लेषणाच्या माध्यमातून ‘ग्रेस्पॉट्स’देखील ओळखण्यात येतील. हा प्रकल्प ‘ट्रीपल आयटी- हैदराबाद’च्या अंतर्गत राबविण्यात येत असून केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, ‘एनएम-आयसीपीएस’ (इंटरडिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टिम), ‘एएनएआय’ (ॲप्लाइड एआय रिसर्च इन्स्टिट्यूट), नागपूर महानगरपालिका, महिंद्रा, इंटेल, सीएसआयआर-सीआरआरआय यांचे सहकार्य लाभत आहे.
या गोष्टींवर असेल भर
- वाहनांची सुरक्षा (एडीएएस आणि चालकांचे प्रशिक्षण)
- मोबिलिटी ॲनालिसिस (ग्रेस्पॉट मॅपिंग)
- इन्फ्रास्ट्रक्चर सेफ्टी (ब्लॅकस्पॉट फिक्सिंग)
देशाच्या इतर भागातदेखील प्रकल्प राबविणार
‘आय-रस्ते’ची सुरुवात नागपुरातून होणार असली, तरी देशातील इतर शहरांमध्येदेखील त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महामार्गांवर धावणाऱ्या बसेसमध्ये हे तंत्रज्ञान बसविण्यासाठी तेलंगणा सरकारशी चर्चा सुरू आहे. याशिवाय, या प्रकल्पाची व्याप्ती गोवा व गुजरातपर्यंतदेखील वाढविण्यात येणार आहे.
विशिष्ट ‘फ्रेमवर्क’देखील विकसित
इंडियन ड्रायव्हिंग डाटासेट वापरून ‘ऑर्डर’ हा डाटासेट तयार करण्यात आला आहे. ‘एलआरनेट’ हे एकात्मिक यंत्रणा असलेले ‘फ्रेमवर्क’ विकसित करण्यात आले आहे. रस्त्यांचे मापदंड विचारात घेऊन येथील समस्या दूर करण्यासाठी याचे ‘डिझाइन’ करण्यात आले आहे. या माध्यमातून लेन मार्किंग, तुटलेले दुभाजक, खड्डे, रस्त्यांवरील भेगा, इत्यादी जोखमीच्या मुद्द्यांचे अध्ययन करण्यात येईल. शिवाय, मॉड्युलर स्कोअरिंग फंक्शनच्या आधारे रस्त्याच्या गुणवत्तेचीदेखील गणना करण्यात येईल.