माफसूचे कुलगुरू डाॅ. आशिष पातुरकर यांना ‘रिसर्च लिडरशिप पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 05:43 PM2022-07-09T17:43:50+5:302022-07-09T17:46:20+5:30
त्यांना हा पुरस्कार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पार पडलेल्या समारंभात प्रदान करण्यात आला.
नागपूर : भारतीय कृषी खाद्य परिषद आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय पशुस्वास्थ्य शिखर परिषद-२०२२ मध्ये महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डाॅ. आशिष पातुरकर यांना ‘रिसर्च लिडरशिप पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
त्यांना हा पुरस्कार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पार पडलेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. परिषदेचे उद्घाटन केंद्रीय पशू व मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते करण्यात आले.
संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या संशोधकास हा पुरस्कार देण्यात येतो. डाॅ. पातुरकरांनी जागतिक बँक, विज्ञान व प्रौद्याेगिकी विभाग, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर आदींच्या माध्यमातून २५ पेक्षा जास्त संशोधन प्रकल्प राबविलेले आहेत. अन्नसुरक्षा क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे जागतिक आरोग्य संघटनेने प्राणिजन्य अन्नातील अँटीबायोटिक्सच्या अवशेषांसंबंधी मानके तयार करण्याकरिता गठित समितीमध्ये तज्ज्ञ म्हणून नामांकित केले होते.