प्रभागात वास्तव्य नाही, तरी मतदार यादीत नावे; यादीवर तब्बल ५१८ हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2022 03:19 PM2022-07-05T15:19:01+5:302022-07-05T15:20:33+5:30
नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी नोंदविलेल्या आक्षेप योग्य असल्यास त्यानुसार प्रभागाच्या मतदार यादीतील त्रुटी दूर केल्या जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
नागपूर :नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नुकत्याच प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यावर ३ जुलैपर्यंत हरकती स्वीकारण्यात आल्या. तब्बल ५१८ लोकांनी हरकती नोंदविल्या आहेत. काही प्रभागांच्या मतदार यादीत त्रुटी आहेत. वास्तव्य असलेल्या प्रभागातील मतदारयादीत नावांचा समावेश न करता दुसऱ्या प्रभागातील मतदार यादीत समावेश असल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
आक्षेप नोंदविण्याच्या अखेरच्या दिवशी ३ जुलैला सर्वाधिक १६७ हरकती प्राप्त झाल्या. प्रभाग २२ मधील अनेक मतदारांची नावे प्रभाग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. असाच प्रकार ९, १० आणि ११ क्रमांकाच्या प्रभागात घडला आहे. प्रभाग ५२ मधील अनेक मतदारांची नावे प्रभाग ४३ च्या मतदार यादीत जोडण्यात आलेली आहे. प्रभाग ४१ मधील मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याबाबत आक्षेप नोंदविण्यात आला आहे, तर काही मतदारांची नावे यादीत नसल्याबाबत तक्रारी केल्या आहेत. नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी नोंदविलेल्या आक्षेप योग्य असल्यास त्यानुसार प्रभागाच्या मतदार यादीतील त्रुटी दूर केल्या जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
हरकती नोंदविण्यासाठी आधी ३० जूनपर्यंत स्वीकारण्याची अंतिम मुदत होती. या कालावधीत ५४ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. नंतर ३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. महापालिकेची अंतिम प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर आरक्षण सोडत आणि आता प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
१,५२,८०९ मतदार वाढले
५२ प्रभागांच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ३१ मे २०२२ रोजीची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. सर्व प्रभागांत ३ सदस्य अशा १५६ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत २२ लाख ४५ हजार ८०९ मतदार राहतील. मागील निवडणुकीत शहरातील मतदारांची संख्या २० लाख ९३ हजार ३९२ होती. म्हणजेच १ लाख ५२ हजार ८०९ मतदार वाढले आहेत.
प्रारुप मतदार यादीवर झोननिहाय प्राप्त हरकती
लक्ष्मीनगर - ३०
धरमपेठ - २१
हनुमाननगर - ५४
धंतोली - ३५
नेहरूनगर - १६
गांधीबाग - ६१
सतरंजीपुरा - ३२
लकडगंज - ५८
आसीनगर - ११७
मंगळवारी - ९४
-एकूण - ५१८