चालत्या स्कूल व्हॅनचे चाक निखळले, १० शाळकरी मुलांचा जीव वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 10:13 PM2022-11-22T22:13:22+5:302022-11-22T22:13:47+5:30
Nagpur News मंगळवारी सकाळी वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर १० शाळकरी मुलांचा जीव थोडक्यात वाचला.
नागपूर : मंगळवारी सकाळी वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर १० शाळकरी मुलांचा जीव थोडक्यात वाचला. चालत्या स्कूल व्हॅनचे चाक निघाले व क्षणात व्हॅन एका बाजूने कलंडली. तशाच स्थितीत व्हॅन काही अंतर अक्षरश: घासत गेली. व्हॅनचा वेग नियंत्रणात आल्याने तिला थांबवण्यात यश आले. जर वेग जास्त असता तर अनर्थ झाला असता. या प्रकारामुळे व्हॅनमधील शाळकरी मुले अक्षरश: हादरली होती.
एका नामांकित शाळेतील जवळपास १० विद्यार्थी एमएच ४९-जे-०३६३ या व्हॅनमध्ये सकाळी ९ वाजता चालली होती. छत्रपती नगर मेट्रो स्थानकाजवळ पोहोचल्यावर अचानक व्हॅन हेलकावे खाऊ लागली. मागील वाहनचालकांच्या लक्षात हा प्रकार आला. अगदी काही क्षणातच व्हॅनचे डाव्या बाजूचे मागील चाक निखळले. व्हॅन एका बाजूला कलंडली आणि तशीच घासत समोर गेली. सुदैवाने या घटनेत कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर पालकांनी तेथे धाव घेतली. पोलिसांनादेखील याची सूचना देण्यात आली.
मोठी दुर्घटना टळली
सकाळची वेळ असल्यामुळे उड्डाणपुलावर जास्त गर्दी नव्हती. जर गर्दी असती तर मागील वाहन या व्हॅनला धडकण्याचा धोका होता. मात्र वेग कमी असल्याने व गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
व्हॅनवर जुन्या मालकाचाच क्रमांक
व्हॅनवर एक मोबाईल क्रमांक लिहिलेला होता. या क्रमांकावर संपर्क केला असता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. संबंधित क्रमांक हा व्हॅनच्या जुन्या मालकाचा होता. त्याने लॉकडाऊनच्या अगोदर व्हॅन विकली होती. मात्र नवीन मालकाने व्हॅनवर तोच क्रमांक ठेवला होता.
दररोज रस्त्यांवर धावतो मृत्यू
नागपूर शहरातील हजारो मुले स्कूल व्हॅन्सने शाळांमध्ये जातात. यातील अनेक व्हॅन या तांत्रिकदृष्ट्या फिट नाहीत. व्हॅन्समध्ये विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसविण्यात येते. त्यांच्या पालकांकडून अवाच्या सवा दर घेण्यात येतात. मात्र व्हॅनच्या सुरक्षेकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात येते असे चित्र आहे.