अतिमहत्त्वाकांक्षेपोटी गेली आरटीओ इन्स्पेक्टर गीता शेजवळ यांची विकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 09:39 PM2023-05-05T21:39:31+5:302023-05-05T21:40:27+5:30

Nagpur News अतिमहत्त्वाकांक्षा बाळगून कुणी काम करीत असेल तर त्या व्यक्तीच्या हातून सगळेच जाते. परिवहन विभागात सतत चर्चेत राहणाऱ्या आरटीओ इन्स्पेक्टर गीता शेजवळ यांच्याबाबत असेच झाले.

The wicket of RTO Inspector Geeta She went against the ambition | अतिमहत्त्वाकांक्षेपोटी गेली आरटीओ इन्स्पेक्टर गीता शेजवळ यांची विकेट

अतिमहत्त्वाकांक्षेपोटी गेली आरटीओ इन्स्पेक्टर गीता शेजवळ यांची विकेट

googlenewsNext

नरेश डोंगरे 
नागपूर : अतिमहत्त्वाकांक्षा नेहमीच नडते. सारे काही सुरळीत असताना हेही पाहिजे, तेही हवे अन् सारेच्या सारेच हातात हवे, अशी अतिमहत्त्वाकांक्षा बाळगून कुणी काम करीत असेल तर त्या व्यक्तीच्या हातून सगळेच जाते. परिवहन विभागात सतत चर्चेत राहणाऱ्या आरटीओ इन्स्पेक्टर गीता शेजवळ यांच्याबाबत असेच झाले.

गुरुवारी रात्री त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) विकेट घेतली. शेजवळ यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ तसा वादग्रस्तच आहे. त्यांच्यासाठी तक्रारी, चाैकशी अन् गुन्हे दाखल होणेसुद्धा नवीन नाही. मात्र, वरपर्यंत सेटिंग असल्याने हे सर्व होऊनही त्या बिनधास्त वावरत होत्या. आरटीओतील सर्वात दबंग महिला अधिकारी म्हणूनही त्या ओळखल्या जातात. रस्त्यावर ऑन ड्युटी असताना त्यांचे वर्तन, त्यांची भाषा ‘घाट घाट का पाणी पिणाऱ्या ट्रकचालकाची’ही बोलती बंद करणारी होती. ज्या ठिकाणी त्यांची ड्युटी असायची, तेथे त्यांच्या मर्जीतील काही खासगी इसमांची पठाणी वसुलीही अवघ्या आरटीओत चर्चेला येत होती.

अशी पार्श्वभूमी असताना, गेल्या चार महिन्यांपूर्वी त्या आक्रमकपणे चर्चेत आल्या. एका अधिकाऱ्याला टार्गेट केल्याने नागपूर-विदर्भाच्या आरटीओतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी फळी त्यांच्या विरोधात गेली. त्यानंतरही त्यांची आक्रमकता तशीच राहिल्याने त्यांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ फेब्रुवारीला लाच घेताना अटक केली. या प्रकरणानंतर आरटीओच्या दोन गटात मुंबई-पुण्यातील काही जणांनी मांडवली करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही दिवसांसाठी त्या बॅकफूटवर गेल्या. मात्र, नंतर पुन्हा त्यांनी खाडे नामक निवृत्त अधिकाऱ्याच्या साथीने नागपूर, विदर्भातील बदलीचे रॅकेट विस्तारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ‘लोकमत’ने हे प्रकरण उघड करून राज्यभर खळबळ उडवून दिली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधाने आरटीओतील बदल्या ऑनलाईन करण्याचे परिपत्रकच काढण्याचे आदेश दिले. तर, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चाैकशी एसआयटीकडे सोपविली. हे सर्व सुरू असताना आरटीओच्या ‘रामटेकच्या गडा’सह सर्व चेक पोस्टवर होणारी रोजची ‘लाखोंची एन्ट्री’ तसेच रेती, गिट्टी, मुरूम, ओव्हरलोडचा ताबा घेण्यासाठी दलाल कामी लागले अन् १ मेपासून बिनधास्त वसुल्या सुरू झाल्या. त्याचवेळी शेजवळ यांची विकेट जाणार असल्याची चर्चा रंगली अन् गुरुवारी ती खरी ठरली.


करोडोचा मामला, चारशेत निपटला

आरटीओत महिन्याला कोट्यवधीची एन्ट्री जमा होते, असे संबंधित सांगतात. दबंग शेजवळ यांची विकेट मात्र चारशे रुपयांसाठी गेली. लातूरच्या ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीनंतर एसीबीने व्हॉईस रेकॉर्डिंग केले अन् शेजवळ अडकल्या.

पर्स, गणवेष, पैसे सोडून काढला पळ
एसीबीचा ट्रॅप झाल्याचे लक्षात येताच कांद्री बॉर्डर चेक पोस्टवरील कार्यालयातून शेजवळ गायब झाल्या. त्यांनी आपला शासकीय गणवेष, पर्स अन् पैसेही तेथेच ठेवून पळ काढला. शेजवळ यांच्यावरील ट्रॅपने केवळ नागपूर-विदर्भ नव्हे तर राज्यभरातील आरटीओत प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
 

Web Title: The wicket of RTO Inspector Geeta She went against the ambition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.