रेल्वेतून पडलेल्या महिलेला पाच महिन्यांनी आठवला पत्ता; राजस्थानवरून नातेवाईक आले घ्यायला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 07:15 AM2022-06-01T07:15:08+5:302022-06-01T07:15:22+5:30

बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर रेल्वे स्टेशनवर ९ जानेवारी २०२२ रोजी ४८ वर्षीय अनोळखी महिला रेल्वेतून पडली.

The woman who fell from the train remembered the address five months later | रेल्वेतून पडलेल्या महिलेला पाच महिन्यांनी आठवला पत्ता; राजस्थानवरून नातेवाईक आले घ्यायला

रेल्वेतून पडलेल्या महिलेला पाच महिन्यांनी आठवला पत्ता; राजस्थानवरून नातेवाईक आले घ्यायला

Next

नागपूर : डोक्याला गंभीर दुखापतीमुळे पोलिसांनी अकोला मेडिकलमध्ये तिला दाखल केले. नंतर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात ‘रेफर’ केले. तीन महिने उपचारानंतर ती शुद्धीवर आली. मात्र, घराचा पत्ताच ती विसरली. अखेर रवानगी पुनर्वसन केंद्रात केली. तिथे तिच्या तब्येतीत सुधारणा झाली. तब्बल पाच महिन्यांनी तिला घरचा नेमका पत्ता आठवला. नातेवाईकांशी संपर्क साधला. राजस्थानवरून आलेले नातेवाईक पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर रेल्वे स्टेशनवर ९ जानेवारी २०२२ रोजी ४८ वर्षीय अनोळखी महिला रेल्वेतून पडली. डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाली. पोलिसांनी तिला अकोलाच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तोंडातून रक्तही येत असल्याने तिला नागपूरला हलविले. तुटत-तुटक ती बोलायला लागली. स्वत:चे नाव शीला अंबू (रा. परभणी) अशी माहिती देत होती. समाजसेवा विभाग व सेवा फाऊंडेशनने परभणी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला, परंतु तो चुकीचा पत्ता निघाला.

उपचारानंतर सामाजिक संस्थेत पुनर्वसन

ट्रामा केअर सेंटरमध्ये तीन महिने उपचारानंतर आणि तिचा पत्ताही मिळत नसल्याने महिलेला अलका मुंगुले यांच्या मदतीने राणी लक्ष्मीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेत दाखल करण्यात आले. त्यानंतर सुधारणा होत अजून माहिती आठवत गेली आणि एक दिवस तिने राजस्थान येथील अलवार जिह्यातील एका खेडेगावातील पत्त्याची माहिती दिली. तेथे संपर्क साधण्यात आला. तिला पती, तीन मुली, एक मुलगा आणि इतर जवळचा मोठा गोतावळा असल्याचे कळले. सोमवारी तिचे नातेवाईक तिला घेऊन जाण्यासाठी आले. नातेवाईकांना समोर पाहताच तिला रडूच कोसळले.

Web Title: The woman who fell from the train remembered the address five months later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.