नागपूर जिल्ह्यात गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाला जानेवारीपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 08:00 AM2022-11-05T08:00:00+5:302022-11-05T08:00:02+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यामध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाला येत्या जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. हरयाणा सिटी गॅस कंपनीस जिल्ह्याला गॅस पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
आशिष रॉय
नागपूर : जिल्ह्यामध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाला येत्या जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. हरयाणा सिटी गॅस कंपनीस जिल्ह्याला गॅस पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडियाची मुंबई-नागपूर-झर्सुगुडा पाइपलाइन पुढील वर्षी जूनपर्यंत नागपुरात येईल. त्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून पाइपलाइनद्वारे गॅस मिळणे सुरू होईल. हरयाणा सिटी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस पुरवठ्याकरिता नागपूर शहर, बुटीबोरी एमआयडीसी, हिंगणा एमआयडीसी, मिहान इत्यादी परिसराचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
कंपनीने जयप्रकाशनगर येथे कार्यालयही सुरू केले आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले आहे. कंपनी गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या पाइपलाइनमधून शिवमडका येथून गॅसचा पुरवठा घेईल. त्यामुळे सर्वप्रथम बुटीबोरी, मिहान व हिंगणा येथे पाइपलाइनचा गॅस उपलब्ध होईल. त्यानंतर नागपूरला टप्प्याटप्प्याने गॅस दिला जाईल.
या प्रकल्पामध्ये कंपनी पुढील ८ ते १० वर्षांत दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना एलपीजी सिलिंडर खरेदी करावे लागणार नाही. प्रत्येक घरी मीटर बसवले जाईल व नागरिकांना वापरलेल्या गॅसचे मासिक बिल पाठविले जाईल.