नागपुरात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ पुतळा

By आनंद डेकाटे | Published: May 8, 2023 06:14 PM2023-05-08T18:14:13+5:302023-05-08T18:15:31+5:30

Nagpur News छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबागस्थित जागेवर उभारला जाणार आहे.

The world's largest enthroned statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Nagpur | नागपुरात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ पुतळा

नागपुरात उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ पुतळा

googlenewsNext

आनंद डेकाटे 

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबागस्थित जागेवर उभारला जाणार आहे. विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून हा भव्य पुतळा साकारणार आहे.


विद्यापीठाच्या स्थापनेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत असून त्याचे औचित्य साधून या शताब्दी वर्षी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून विद्यापीठाच्या महाराजबागस्थित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा उभारत आहे. हा पुतळा ब्रांझ या धातूचा असून त्याची रीतसर परवानगी महाराष्ट्र शासनाच्या कला व संचालनालय विभागाने दिली आहे. जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ असा हा पुतळा राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतासह जगात मानवतावादी लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याचा सर्वांत पहिला यशस्वी प्रयत्न आहे. त्यामुळे राज्याभिषेकाची आठवण देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा हा जनतेच्या मनात मानवतावादी दृष्टिकोन जागवण्यासाठी प्रेरक ठरणार आहे.


कुलगुरू डाॅ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते सोमवारी यासंदर्भातील माहितीपत्रक प्रकाशित करण्यात आले. यावेळी प्र- कुलगुरू डाॅ. संजय दुधे, स्मारक समितीचे अध्यक्ष डाॅ. मुधोजी राजे भोसले, उपाध्यक्ष शेखर सावरबांधे, सचिव मंगेश डुके, सहसचिव तथा अधिष्ठाता डाॅ. प्रशांत कडू, कोषाध्यक्ष विजय शिंदे, प्राचार्या डॉ. प्रविणा खोब्रागडे उपस्थित होते.


- अभ्यास व संशोधनाची संधी
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, इतिहास संशोधक, अभ्यासक व नागरिकांना प्रगत शिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिक्षण केंद्रांमध्ये शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी यांना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व कार्यावर अभ्यास करण्याची संधी प्राप्त होईल.


- असा असेल पुतळा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची लांबी २० फूट, रुंदी १५ फूट असून उंची ९ फूट आहे. सिंहासनारूढ पुतळ्याची उंची ३२ फूट असून त्यावरील छत्र ७ फूट आहे. ब्रांझ धातूने बनविण्यात येणाऱ्या पुतळ्याचे वजन १०,००० किलोग्राम असेल. पुतळा मूर्तिकार सोनल कोहाड साकारणार आहेत.

Web Title: The world's largest enthroned statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.