पावसाच्या ‘यलो अलर्ट’ने वाढली क्रिकेटप्रेमींच्या हृदयाची धडधड; टी-ट्वेंटी सामन्यावर पावसाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 10:52 PM2022-09-19T22:52:01+5:302022-09-19T22:54:48+5:30
Nagpur News २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागपुरात होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार की नाही म्हणून क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.
नागपूर : येत्या २३ सप्टेंबर रोजी जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-ट्वेंटी सामना आयोजित करण्यात आला आहे; परंतु याच दम्यान हवामान विभागाने २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे जवळपास तीन वर्षांनंतर नागपुरात होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार की नाही म्हणून क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.
नागपुरात जवळपास तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये मोठा उत्साह आहे. रविवारी काही मिनिटातच ऑनलाइन तिकीट विकल्या गेले. सोमवारी तिकीट बुक करणाऱ्या क्रिकेटप्रेमींची मोठी रांग सिव्हिल लाइन्स येथील व्हीसीएवर पाहायला मिळाली. ज्या लोकांनी ऑनलाइन तिकीट बुकिंग केली होती, त्यांनी आज प्रत्यक्ष व्हीसीएवर जाऊन काउंटरवरून तिकीट मिळवली. नागपुरात १० नोव्हेंबर २०१९ रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-ट्वेंटी सामना खेळला गेला होता. त्यानंतर कोविडचे संकट आले. कोविडनंतर नागपुरात होत असलेल्या या सामन्याबाबत विशेष उत्साह आहे.
- व्हीसीएने काढला ५ कोटींचा विमा
व्हीसीएने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्याचा ५ कोटी रुपयांचा विमा काढला आहे. जर सामना पावसामुळे एकही चेंडू न फेकता रद्द केला जाईल तर व्हीसीएला संबंधित रक्कम विमा कंपनीमार्फत मिळेल. जर सामन्यादरम्यान एकही चेंडू टाकला गेला तर विमा कंपनीकडून कुठलीही नुकसानभरपाई मिळणार नाही. सामना रद्द झाला तर तिकीट घेणाऱ्या प्रेक्षकांना तिकिटाची रक्कम परत केली जाईल.
- मुसळधार पावसाची शक्यता
उत्तर-पश्चिम आणि पश्चिम मध्य बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्रासह सायक्लोनिक सर्क्लुलेशन तयार झाले आहे. येत्या २४ तासांत ते उत्तर पश्चिमच्या दिशेने पुढे सरकेल. ओडीशा, छत्तीसगड मार्गे मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये पोहोचेल. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. असे असले तरी अनेकदा अलर्ट अपयशीसुद्धा ठरले आहेत. नागपुरात सोमवारी आकाशात ढग दाटून आले होते. मंगळवारीसुद्धा काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.