पुस्तके विसर्जित करताना तोल गेल्याने तरुण नदीत बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 09:20 PM2022-05-17T21:20:17+5:302022-05-17T21:20:51+5:30
Nagpur News कन्हान नदीच्या पात्रात पुस्तके (ग्रंथ) विसर्जित करताना पाय घसरल्याने ताेल गेला व तरुण प्रवाहात आला. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.
नागपूर : कन्हान नदीच्या पात्रात पुस्तके (ग्रंथ) विसर्जित करताना पाय घसरल्याने ताेल गेला व तरुण प्रवाहात आला. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) परिसरात मंगळवारी (दि. १७) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
आमिर रजा मोहम्मद बशीर शेख (२७, रा. टेकानाका, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ताे मंगळवारी सकाळी कन्हान परिसरात असलेल्या कन्हान नदीच्या कालीघाट परिसरात साेबत काही पुस्तके घेऊन आला हाेता. ती पुस्तके प्रवाहाजवळ उभे राहून पाण्यात विसर्जित करीत असताना अनावधानाने त्याचा पाय घसरला. त्यामुळे ताे पाण्यात पडला व प्रवाहात आल्याने खाेल पाण्यात वाहत गेला.
ताे बुडत असल्याचे काहींच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच पाेलिसांना सूचना देत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पाेहणाऱ्या स्थानिक तरुणांच्या मदतीने त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. शिवाय, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. काही वेळाने ओळख पटल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.