छोट्या भावाला ठेवले अवयवरूपी जिवंत, सोनटक्के कुटुंबियांचा पुढाकार
By सुमेध वाघमार | Published: March 17, 2024 05:30 PM2024-03-17T17:30:24+5:302024-03-17T17:32:49+5:30
आपल्या छोट्या भावाला वाचविता आले नाही याची खंत मोठ्या भावाला होती. परंतु त्याने एक निर्णय घेतला, छोट्या भावाला अवयवरुपी जीवंत ठेवण्याचा.
नागपूर : तो उंचावर इलेक्ट्रिशियनचे काम करीत होता. अचानक तोल गेला आणि खाली पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाली. ‘एम्स’मध्ये शर्थीचे उपचार सुरू असताना त्याचे ‘ब्रेन डेड’ झाले. आपल्या छोट्या भावाला वाचविता आले नाही याची खंत मोठ्या भावाला होती. परंतु त्याने एक निर्णय घेतला, छोट्या भावाला अवयवरुपी जीवंत ठेवण्याचा. या मानवतावादी पुढाकाराने तिघांना नवे आयुष्य तर दोघांना दृष्टी मिळाली.
राकेश सोनटक्के (वय २४) रा. नवेगाव साधू उमरेड असे अवयवदात्याचे नाव. राकेश हा व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता. त्याला आई मंगला, वडील रविंद्र आणि मोठा मुलगा पियुष असा परिवार आहे. ६ मार्चला राकेश उंचावर लेक्ट्रिशियनचे काम करीत होता. अचानक तो खाली पडला. नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत त्याला दाखल केले. येथे त्यांच्यावर ११ दिवस उपचार सुरु होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही तो उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. त्याचा मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव झाला होता. ‘एम्स’च्या डॉक्टरांच्या टीमने १६ मार्च रोजी त्याची तपासणी करून मेंदूमृत घोषित केले. सोनटक्केकुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ‘एम्स’ समन्वयक प्रीतम त्रिवेदी व प्राची खैरे (समन्वयक, एम्स) यांनी नातेवाईकांना अवयव दानाविषयी समुपदेशन केले. त्याचा मोठा भाऊ पियुष सोनटक्के यांनी अवयवदानास संमती दिली. विभागीय प्रत्यारोपण समितीला ही माहिती देण्यात आली. समितीनीने लगेच पुढील प्रक्रिया सुरु केली. विभागीय प्रत्यारोपण समितीने प्रतीक्षा यादी तपासून अवयवांचे वाटप केले.
नागपूर ते वर्धा ग्रीन कॉरिडॉर
राकेश याचे एक मूत्रपिंड एम्समधीलच ५२ वर्षीय पुरुष रुग्णाला दान करण्यात आले. तर दुसरे मूत्रपिंड प्रतिक्षा यादीनुसार ‘एव्हीबीआरएच’ सावंगी वर्धा येथील ३६ वर्षीय महिलेला तर याच रुग्णालयातील ५७ वर्षीय पुरुषाला यकृताचे दान करण्यात आले. यामुळे नागपूर ‘एम्स’ ते वर्धा सावंगी येथील ‘एव्हीबीआरएच’ रुग्णालयापर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आले. कॉर्नियाची जोडी ‘एम्स’ला दान करण्यात आले.