हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या युवकांना पोलिसांचीच मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
By जितेंद्र ढवळे | Published: December 9, 2022 05:51 PM2022-12-09T17:51:12+5:302022-12-09T18:12:45+5:30
मग तक्रार करायची तरी कोणाकडे? नागरिकांचा सवाल
नरखेड (नागपूर) : सावरगाव बस स्टॉप चौकात अस्ताव्यस्त पार्क केलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली. त्याबाबत पोलीस हेल्पलाइन नंबर ११२ वर पवन गजबे (२८) यांनी माहिती दिली. याचा वचपा काढण्याकरिता नरखेड पोलिस स्टेशनच्या दोन शिपायांनी पवन गजबे यांच्यासह शुभम गोंडाणे (२५) याला जबर मारहाण केली. याप्रकरणी दोषी शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन युवक मंचचे राहुल गजबे यांनी केली आहे.
पँथर सेनेचे कार्यकर्ते पवन गजबे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी (६ डिसेंबर) रात्री १०.१५ वाजता सावरगाव बस स्टॉप येथे अस्तव्यस्त पार्क केलेल्या गाड्यांमुळे अपघात होऊ नये म्हणून पोलिस हेल्पलाइन ११२ वर माहिती दिली. त्यानंतर त्याला नरखेड पोलिस स्टेशनमधून कॉल आला व विचारणा झाली. फोन कोणी केला? यावर पवन गजबे यांनी फोन मीच केला व सध्या मी बस स्टॉप चौकात आहे, असे सांगितले. ‘तिथेच थांबा, आम्ही येत आहोत,’ असे पवनला सांगण्यात आले. थोड्याच वेळात पोलिसांची जीप बस स्टॉप चौकात आली. जीपमधून शिपाई रवी साठवणे यांनी पवन गजबे यांना जवळ बोलावले व तक्रार का केली म्हणून कोणतीही विचारणा न करता थापड मारण्यास सुरुवात केली.
‘तुम्ही याला का मारता,’ म्हणून शुभम गोंडाणे याने विचारणा केली असता पोलिस शिपाई जाकीर शेख याने शुभम गोंडाणे यालाही मारहाण सुरू केली. इतकेच नाही तर पवन व शुभम यांना पोलिस जीपमध्ये कोंबून नरखेड पोलिस स्टेशनमध्ये नेले. तिथेसुद्धा त्यांना दोन्ही शिपायांनी मारहाण केली. दोघांच्याही कोऱ्या कागदावर सह्या घेऊन त्यांना यापुढे कुठेही तक्रार करायची नाही, असा दम देऊन सोडण्यात आले. मारहाणीची घटना बस स्टॉप परिसरातील व पोलिस स्टेशनच्या सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे.
याबाबत पोलिस शिपाई रवी साठवणे व जाकीर शेख यांच्याविरुद्ध नरखेड पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली; परंतु पोलिस प्रशासनाने दोषीविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही. गावातील अवैध धंद्याविरुद्ध पवन व शुभम नेहमी आवाज उठवितात. याचाच वचपा रवी साठवणे व जाकीर शेख यांनी काढला आहे. त्यांचे मनोबल खच्चीकरण करून यापुढे त्यांनी अवैध धंद्याबाबत तक्रार करू नये, याकरिताच ही मारहाण करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा दोन्ही पोलिस शिपाई दारू पिऊन आले होते. घडलेल्या प्रकरणाबाबत पोलिस निरीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस अधीक्षक व पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे.
पोलिस अधिकारी दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे झाल्यास पँथर सेना व रिपब्लिकन युवक मंचतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती राहुल गजबे यांनी दिली आहे.
या घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली आहे. दोषीवर योग्य कारवाई करण्यात येईल.
- जयपालसिंग गिरासे, ठाणेदार, नरखेड