नाट्यसंमेलनातून काहीच मिळत नाही! मी जाणेही टाळतो! ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:50 PM2019-09-20T22:50:39+5:302019-09-20T22:52:01+5:30
नाट्यसंमेलनांमध्ये केवळ नाटके होतात काहीच निष्पन्न होत... असे माझे मत आहे. मला तर काहीच मिळाले नाही आणि त्यामुळेच, मी जाणेही टाळतो. किंबहुना, मी नाट्यसंमेलनाला जातच नाही.. असे परखड मत प्रख्यात ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाट्यसंमेलनांमध्ये केवळ नाटके होतात आणि ज्याला मनोरंजन हवे असेल त्याला मनोरंजन मिळते. बाकी काही मिळत नाही, काहीच निष्पन्न होत... असे माझे मत आहे. मला तर काहीच मिळाले नाही आणि त्यामुळेच, मी जाणेही टाळतो. किंबहुना, मी नाट्यसंमेलनाला जातच नाही.. असे परखड मत प्रख्यात ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी व्यक्त केले. यावेळी, प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत व सिद्धीविनायक पब्लिसिटीचे प्रमुख समीर पंडित उपस्थित होते.
अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे घेतली जाणारी नाट्यसंमेलनांमध्ये कुठल्या चर्चा घडताना मला तरी आढळत नाहीत. आणि चर्चा घडल्या तरी त्यातून अपेक्षित सुधारणा किंवा हवे असलेले परिवर्तन घडले... असेही मला कधी दिसले नाही. मी एकदा एका नाट्यसंमेलनाला गेला. त्यानंतर, पुन्हा कधी माझी इच्छा झाली नाही.. असे अशोक सराफ पत्रकारांशी बोलताना सांगत होते. विनोदी भूमिका आणि विनोदनिर्मिती... याबद्दल वर्तमान आणि भूतकाळात कोणता फरक जाणवतो, असा सवाल उपस्थित केल्यावर त्यांनी.. वर्तमानातील विनोदबुद्धीवर थेट प्रहार करत, प्रेक्षक हसत नाहीत. केवळ आग्रहाने हसविले जात असल्याचे स्पष्ट केले. आमच्या काळातील चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका आणि विनोद निर्मितींचा बाज वेगळा होता. प्रेक्षक विचार करून हसत होते किंवा हसून विचार करत होते. आता, तसे कुठे दिसते... असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्याही काळात विनोदात रटाळता होती.. हे मान्यच करावे लागेल. त्यामुळे, एकसुरीपणा निर्माण झाला होता आणि त्याच त्या भूमिका वठवाव्या लागत होत्या. मात्र, याला कोणी एक जबाबदारी नव्हता. तर, निर्मितीच्या क्षेत्रात असलेले लेखक, दिग्दर्शक आणि तेवढाच कलावंतही जबाबदार होता... अशी कबूलीही सराफ यांनी दिली. मी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आलो तेव्हा शाब्दिक आणि प्रासंगिक विनोद चालत होता. त्यात स्लॅप्स्टिक कॉमेडीची जोड देऊन, प्रासंगिक देहबोली जोडली. अपघातात सहा महिने बेडवर असल्याने, माझ्या वाट्याला आलेल्या सर्व भूमिका लक्ष्मीकांत बेर्डेकडे गेल्या आणि माझ्यासारखा विनोद करून त्याने स्वत:ला सिद्ध केले. मात्र, आमच्या काळात विक्षिप्तपणा नव्हता.. असे ते आवर्जुन सांगत होते.
संमेलनाच्या आयोजनात प्रचंड परिश्रम असतात - निर्मिती सावंत
नाट्यसंमेलनाच्या आयोजनांमध्ये स्थानिक कलावंतांना प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात आणि तेथे बाहुल्यांसारखे जाऊन आम्ही कलावंत मिरवित असतो. अशा संमेलनांमध्ये ज्यांना जे मिळत असेल, तो त्यांचा भाग. मात्र, त्यांच्यावर बोट ठेवून त्यांच्या परिश्रमाचा अपमान कशाला करायचा, असे निर्मिती सावंत यावेळी म्हणाल्या. यासोबतच, वेगवेगळ्या शहरांमध्ये खड्ड्यांचा सामना करावा लागतो. त्यासाठी प्रत्येकवेळी सरकारलाच जबाबदार धरण्यापेक्षा, नागरिक म्हणून आम्ही काय करतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.