नागपुरात अभिनय कार्यशाळेसह रंगभूमी सप्ताहाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:46 AM2019-03-28T00:46:20+5:302019-03-28T00:47:17+5:30
जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभाषा परिवार आणि मेराकी थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभूमी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या तरुणांसाठी मेराकी थिएटर्सच्या ‘फर्स्ट बेल ऑन स्टेज’ या उपक्रमांतर्गत अभिनय कार्यशाळेद्वारे बुधवारी रंगभूमी सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभाषा परिवार आणि मेराकी थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभूमी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनयाच्या क्षेत्रात पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या तरुणांसाठी मेराकी थिएटर्सच्या ‘फर्स्ट बेल ऑन स्टेज’ या उपक्रमांतर्गत अभिनय कार्यशाळेद्वारे बुधवारी रंगभूमी सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रभाषा भवन, उत्तर अंबाझरी रोड, रामदासपेठ येथे रंगभूमीचा सप्ताह साजरा केला जात आहे. बुधवारी आयोजित अभिनय कार्यशाळेत तरूण नाट्यकर्मी रूपेश पवार आणि ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भिसीकर यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत शहरातील या क्षेत्रात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या १९ नवोदितांनी सहभाग घेतला. रूपेश पवार यांनी नाट्याभिनयाचे धडे नवोदितांना दिले. रंगभूमीचे महत्त्व, नाटकाचे महत्त्व, नाटकांचे विषय, रंगभूमीवरील वावर, वाचिक-शारिरिक अभिनय आदी विषयांवर विस्तृत असे मार्गदर्शन त्यांनी केले. नवोदितांना थिएटरचे स्वत:च्या भावनिक आनंदाशिवाय व्यावहारिक जीवनात असलेले महत्त्व, एक चांगला कलावंत घडण्याचा प्रवास त्यांना सांगणे, त्यांनी प्रामाणिकपणे कार्य करून अभिनयाचा तळ गाठावा आणि तांत्रिक गोष्टी जाणाव्या हा या कार्यशाळेचा उद्देश असल्याचे सांगत हे तरुण कलावंत उद्या नागपूरची रंगभूमी समृद्ध करतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
रंगभूमी दिन सप्ताहात गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता ‘ओपन माईक’ सत्रामध्ये ‘माय फर्स्ट नोट’ हा उपक्रम राबविला जाणार असून यात तरुण त्यांच्या पहिल्यावहिल्या कथा, कवितांचे वाचन करतील. २९ ते ३१ मार्च यादरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता ‘पिकनिक, रिहर्सल’, ‘दर्प, गुड और बेस्ट’ तसेच ‘श्री गणेशा’ व ‘पेशावर से लाहोर तक’ या सहा एकांकिका महोत्सवात सादर केल्या जाणार आहेत़ गुरुवारी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहायक संचालक अल्का तेलंग यांच्याहस्ते या एकांकिका महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याचे रूपेश पवार यांनी सांगितले.