थिएटर्स हाऊसफुल्ल, मात्र बॉक्स ऑफिसचे गणित बिघडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 07:00 AM2021-11-07T07:00:00+5:302021-11-07T07:00:02+5:30

Nagpur News १८-१९ महिन्यांचा लॉकडाऊन भोगल्यानंतर सिनेमागृह अनलॉक झाले आणि सिनेमांचे प्रदर्शन सुरू झाले. मात्र, ५० टक्के आसनक्षमतेच्या निर्बंधामुळे चित्रपटगृह आणि चित्रपट निर्मात्यांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Theaters are housefull, but the box office math will go bad! | थिएटर्स हाऊसफुल्ल, मात्र बॉक्स ऑफिसचे गणित बिघडणार!

थिएटर्स हाऊसफुल्ल, मात्र बॉक्स ऑफिसचे गणित बिघडणार!

Next
ठळक मुद्देकाही मल्टिप्लेक्स अजूनही बंदच ५० टक्के आसनक्षमतेचा परिणाम

प्रवीण खापरे

नागपूर : लक्ष्मीपूजनापासून तब्बल १९ महिने बंद असलेली चित्रपटगृहे उघडली आणि चित्रपटांचे प्रदर्शन सुरू झाले. मात्र, ५० टक्के आसनक्षमतेच्या निर्बंधामुळे चित्रपटगृह आणि चित्रपट निर्मात्यांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२० मार्च २०२० ते २२ ऑक्टोबर २०२१ असा १८-१९ महिन्यांचा लॉकडाऊन भोगल्यानंतर सिनेमागृह अनलॉक झाले आणि लक्ष्मीपूजनापासून चित्रपटगृहांमध्ये सिनेमांचे प्रदर्शन सुरू झाले. त्यामुळे थिएटर्स मालक, संचालकांसोबतच चित्रपट निर्माते, अभिनेते व या उद्योगाशी संबंधित सर्वच कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे असतानाही ५० टक्के आसनक्षमतेचे निर्बंध असल्यामुळे बॉक्स ऑफिसचे गणित बिघडणार आहे. शिवाय, कोरोना संक्रमणानंतर आणि लॉकडाऊन उठल्यानंतर लागलीच प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, याची कल्पना नसल्याने अनेक मल्टिप्लेक्स समूहांनी मुंबई, पुणे वगळता इतर शहरांतील स्क्रीन अद्यापही ओपन केलेल्या नाहीत. याचा फटका चित्रपटांना अपेक्षित गल्ला जमविण्यावर पडणार आहे. नागपुरात कार्निव्हल सिनेमाचे स्क्रीन अद्यापही बंदच आहेत.

अर्धे प्रेक्षक आधीच गायब

नवा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर रसिकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळे रसिकांच्या प्रतिसादाचा पहिला वीकेंड (शुक्रवार, शनिवार, रविवार) महत्त्वाचा ठरतो. चित्रपटाच्या पब्लिक ओपिनियननुसार नंतर चित्रपटाकडे वळणारी गर्दी निर्धारित होत असते. त्यामुळेच साधारणत: पहिल्या वीकेंडला स्टार पॉवर्स असलेल्या सिनेमांना चिक्कार गर्दी असते. त्याला लाभ चित्रपटगृहांना होतो. मात्र, ५० टक्के आसनक्षमतेच्या निर्बंधामुळे रसिकांची अर्धी गर्दी आधीच गायब झालेली आहे.

बॉक्स ऑफिसला तोटा

५० टक्के आसनक्षमतेमुळे अर्धी गर्दी आधीच संपुष्टात आली आहे. कोरोनात रखडलेले अनेक सिनेमे रांगेत आहेत आणि एकापाठोपाठ दर आठवड्याला ते सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे एका सिनेमाचा अपेक्षित गल्ला भरण्यापूर्वीच दुसऱ्या सिनेमाकडे प्रेक्षक वळणार आहेत. त्याचा फटका चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसला बसणार आहे.

चित्रपटगृहे आधीच संकटात

गेल्या १८-१९ महिन्यापासून चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स बंद होते. या काळात शासनाने पाणी, वीज, मनोरंजन कर, जीएसटीमध्ये कसलीच सवलत दिली नाही. त्यात ५० टक्के आसनक्षमतेचे निर्बंध असल्याने वीकेंडचा लाभही मिळणार नाही. शिवाय, संक्रमणाच्या धास्तीने अजूनही प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळतील की नाही, ही शंका आहे. अशात तोटा हा ठरलेलाच आहे. म्हणून नागपुरातील कार्निव्हल सिनेमाच्या स्क्रीन अद्याप बंदच आहेत.

- राजेश राऊत, व्यवस्थापक, कार्निव्हल सिनेमा, नागपूर

.................

Web Title: Theaters are housefull, but the box office math will go bad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा