सुटे भाग चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By Admin | Published: September 8, 2016 02:46 AM2016-09-08T02:46:13+5:302016-09-08T02:46:13+5:30

वीज प्रकल्पातून अग्निशमन विभागात वापरल्या जाणाऱ्या लाखो रुपयांचे सुटे भाग चोरणाऱ्या टोळीचा कोराडी पोलिसांनी पर्दाफाश केला.

Theft expose the thieves | सुटे भाग चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सुटे भाग चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext

सहा जणांना अटक : वीज केंद्रातील दीड लाखांचा चोरीचा ऐवज जप्त
कोराडी : वीज प्रकल्पातून अग्निशमन विभागात वापरल्या जाणाऱ्या लाखो रुपयांचे सुटे भाग चोरणाऱ्या टोळीचा कोराडी पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीतील चौघांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. आरोपींकडून १ लाख ४६ हजार रुपये किमतीचे विविध सुटे भाग जप्त करण्यात आले आहे.

असलम खान (१८), प्रदीप कोठवाड (२२), संजय वाकले (२३) सर्व रा. महादुला, अजय शाहू व मनीष वासनिक (रा. नागपूर) आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळविली आहे.
सविस्तर असे की, कोराडी वीज प्रकल्पात अग्निशमन संबंधी काम करणाऱ्या दिल्ली येथील न्यू फायर इंजिनिअरिंग कंपनीच्या प्रकल्प कार्यालयातून ३१ आॅगस्टला अडीच लाख रुपये किमतीचे पितळी सुटे भाग भंगार चोरट्यांनी पळविले.
या संदर्भात कंपनीतर्फे प्रभात रंजन सिंग यांनी कोराडी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
पोलीस तपासादरम्यान, सदर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींनी सदर चोरीची कबुली दिल्यावर माल विकत घेणाऱ्या अजय शाहू व मनीष वासनिक (रा. नागपूर) यांनाही पोलिसांनी अटक करून सर्वांची पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळविली. आरोपींनी सर्व चोरीच्या साहित्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून १ लाख ४६ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. उर्वरित साहित्य व चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावणाऱ्या आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
कोराडी वीज केंद्र व प्रकल्पात भंगार चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. यातील अनेक घटनांची तक्रारही केली जात नाही. या घटनेने भंगार चोर व भंगार व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश लोंडे व शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक टी.एस. मेश्राम, शिपाई दिनेशसिंग ठाकूर, सुरेश बर्वे, सुशील बहिरे, अनुप यादव यांनी बजावली. (प्रतिनिधी)

Web Title: Theft expose the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.