नागपुरातील चोरट्यांनी लावली शाळेतील कक्षांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:57 AM2018-07-24T00:57:04+5:302018-07-24T00:59:27+5:30
चोरट्यांनी लावलेल्या आगीत शाळेतील रोख रक्कम आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह दोन लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोला हायस्कूलमध्ये सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चोरट्यांनी लावलेल्या आगीत शाळेतील रोख रक्कम आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह दोन लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोला हायस्कूलमध्ये सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ भोला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास चोरटे शाळेच्या आवारात शिरले. त्यांनी संस्था सचिव, ज्युनियर कॉलेजच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. आतमधील मौल्यवान चीजवस्तू आणि रोख रक्कम शोधण्यासाठी आतमधील सर्व साहित्य, कागदपत्रांची फेकाफेक केली. त्यानंतर प्राचार्यच्या कक्षात शिरून तेथील कागदपत्रे, सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर आणि फर्निचरला आग लावून दिली. या आगीत नमूद साहित्यांसह प्राचार्यांच्या कक्षातील रोख आठ हजार रुपयेदेखील जळून खाक झाले. पहाटे ३.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर जयदेव संतोषकुमार मुजुमदार (वय ७५, रा. गोविंदनगर) यांनी संस्थेतर्फे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
चोरीसाठी की ....?
चोरट्यांनी प्राचार्याच्या कक्षाला आग लावून दिली. तसेच संस्थेतील विविध कक्षातील कागदपत्रे जाळून टाकली. त्यात रक्कमही जळली. त्यामुळे चोरटे येथे चोरीसाठी आले होते की त्यांचा ‘जुना अहवाल’ नष्ट करण्याचा उद्देश होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधाने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पाचपावली पोलीस तपास करीत आहेत.