नागपुरात माजी पोलीस आयुक्तांकडे चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:01 AM2019-01-15T01:01:18+5:302019-01-15T01:02:04+5:30
येथील माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या इमारतीतील मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या इमारतीतील मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
चक्रवर्ती धरमपेठेतील झेंडा चौकात राहतात. त्यांच्या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या माळ्यावर दोन मंदिर आहेत. येथे पंडित नेहमी पूजा करण्यासाठी येतो. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी पंडित पूजा करायला आले. मंदिरातील सोन्याची गणपतीची मूर्ती व अन्य साहित्य तेथे नसल्याचे त्यांना दिसले. त्यांनी नोकरांकडे विचारणा केली, मात्र त्यांनी माहिती नाही, असे सांगितले. त्यानंतर पंडित यांनी चक्रवर्ती यांना माहिती दिली. चक्रवर्ती यांनी दोन्ही मंदिरातील साहित्य बघितले. मंदिरातील सोन्याच्या मूर्तीसह सोन्याचे नाणे, चांदीची पेटी व चांदीच्या पादुकाही चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्याने चक्रवर्ती यांनी सीताबर्डी पोलिसांना घटनेची माहिती दिली. लगेच सीताबर्डी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. त्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत चक्रवर्ती यांच्याकडे काम करणाऱ्या नोकराने चार दिवसांपूर्वीच काम सोडल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यानेच ही चोरी केल्याचा संशय आहे. तो नोकर पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्या नोकराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक पश्चिम बंगालला जाणार असल्याची माहिती आहे.