नागपुरात पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:46 PM2020-07-21T21:46:38+5:302020-07-21T21:48:45+5:30
विलगीकरण कक्षात असलेल्या कुशीनगरातील ग्रामीणमधील पोलीस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी करून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर जरीपटका ठाण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विलगीकरण कक्षात असलेल्या कुशीनगरातील ग्रामीणमधील पोलीस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी करून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर जरीपटका ठाण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
कुशीनगरात राहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरातील सदस्य कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर त्याच्या कुटुंबीयांना आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. शिवाय कुशीनगर परिसर सील करण्यात आला. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरात शिरून ३ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख २५ हजार रुपये असा मुद्देमाल चोरून नेला. आज मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
ही माहिती जरीपटका पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मनपा कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घर निर्जंतुकीकरण केल्यानंतर पंचनामा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.