नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा येथील युनियन बँकेत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:29 PM2018-05-29T23:29:20+5:302018-05-29T23:30:04+5:30
चोरट्याने बँकेचे शटर वाकवून आत प्रवेश करीत कॅशियरच्या केबिनमधील ड्रॉवर हुडकले. मात्र, हाती केवळ १,५०० रुपये लागल्याने ती रक्कम घेऊन तो पळून गेला. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचारीसावंगा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अवघ्या सात तासात अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चोरट्याने बँकेचे शटर वाकवून आत प्रवेश करीत कॅशियरच्या केबिनमधील ड्रॉवर हुडकले. मात्र, हाती केवळ १,५०० रुपये लागल्याने ती रक्कम घेऊन तो पळून गेला. ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचारीसावंगा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अवघ्या सात तासात अटक केली.
भूषण बाबूराव सलाम (२३, रा. गणेशपूर, ता. काटोल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भूषणने सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कचारीसावंगा (ता. काटोल) येथील युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेचे शटर वाकवून आत प्रवेश केला. तत्पूर्वी त्याने मध्यरात्री १२.२४ वाजताच्या सुमारास या भागाची पाहणीही केली होती. आत शिरल्यानंतर त्याने कॅशियरच्या केबिनमधील ड्रॉवर हुडकले. त्यातील १,५०० रुपये त्याच्या हाती लागले. त्यानंतर त्याने पळ काढला.
पहाटे ५ वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षक भूषण शिंदे, रा. लाडेगाव, जिल्हा वर्धा यास बँकेत चोरी झाल्याचे आढळून आले. त्याने आरडाओरड करताच नागरिक गोळा झाले. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, बँक शाखा व्यवस्थापक सुरेश सोनकुसरे, काटोलचे ठाणेदार एस. एस. राजपूत, कोंढाळीचे उपनिरीक्षक पवन भांबूरकर व सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची पाहणी करून सकाळी ७.३० वाजतापासून तपासाला सुरुवात केली. दरम्यान, आरोपी भूषणला सकाळी १० वाजताच्या सुमारास कचारीसावंगा परिसरातून ताब्यात घेत अटक केली.
मोटरसायकल जप्त
आरोपी भूषणने चोरी करण्यासाठी वापरलेली एमएच-४९/झेड-०८५३ क्रमांकाची मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली. तो कचारीसावंगा नजीकच्या गणेशपूर येथील राहणारा असून, पूर्वी म्हाडामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा. त्याला पाच महिन्यांपूर्वी कामावरून कमी करण्यात आल्याने तो सध्या बेरोजगार आहे. बँकेतील तिजोरीमध्ये आठ लाख रुपये होते. ती त्याला फोडता न आल्याने ही रक्कम बचावली.
‘अलार्म’ वाजला नाही
या बँक शाखेत विविध ठिकाणी एकूण आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पैकी आतील तीन व बाहेरील एक असे एकूण चार कॅमेरे त्याने फोडले व शेजारच्या शेतात फेकले. ते जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बँकेत ‘सेक्यूरिटी अलार्म’ लावला आहे. बँक बंद करतेवेळी ‘नाईट मोड’ करण्याचे कर्मचारी विसरले. त्यामुळे चोरटा आत प्रवेश करतेवेळी ‘अलार्म’ वाजला नाही.