कर्मचाऱ्यानेच केली होती क्वारंटाईन सेंटरमध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:06 AM2021-06-03T04:06:47+5:302021-06-03T04:06:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचपावली पोलीस क्वार्टर येथील कोविड क्वारंटाईन सेंटरमधून इलेक्ट्रिक वस्तूंची चोरी करणाऱ्या युवकाला पाचपावली पोलिसांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली पोलीस क्वार्टर येथील कोविड क्वारंटाईन सेंटरमधून इलेक्ट्रिक वस्तूंची चोरी करणाऱ्या युवकाला पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून २३ पंखे आणि बाईकसह एक लाखाचे साहित्य जप्त करण्यात आले. विक्की राजीन उंदीरवाडे (वय ३२, रा. माॅडेल टाऊन, बेझनबाग) असे आरोपीचे नाव आहे.
पाचपावली येथे पोलीस क्वार्टरची नवीन इमारत तयार आहे; परंतु येथील खोल्या अजूनही वितरित न झाल्याने क्वार्टर रिकामे आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी येथे महापालिकेने क्वारंटाईन सेंटर बनविले आहे. या सेंटरमध्ये आरोपी विक्की हाऊसकीपिंगचे काम करीत हाेता. क्वारंटाईन सेंटर असल्याने येथे तैनात कर्मचारी व रुग्णांसह कुणाचेही येणे-जाणे नव्हते. याचा फायदा उचलून विक्की पोलीस क्वार्टरमधील पंखे व इतर सामानाची चोरी करू लागला. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या रोडावल्याने विक्की दररोज एक-दोन पंखे चोरून नेऊ लागला. सेंटरमधील पंखे गायब झाल्यामुळे आठवडाभरापूर्वी सेंटरमधील लोकांचे याकडे लक्ष गेले. त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी पाचपावली पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी क्वारंटाईन सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा त्यांना विक्कीच्या हालचालींबद्दल संशय आला. तो बॅग घेऊन ड्यूटीवर येत होता. जाताना त्याच्या बॅगेत वस्तू असल्याचे दिसून येत हाेते. पोलिसांनी विक्कीला बाईकने घरी जात असताना पकडले. त्याच्या बॅगेची तपासणी केली तेव्हा त्यात अनेक पंखे होते. तो हे पंखे विकण्याच्या तयारीत होता. यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला. क्वारंटाईन सेंटरमधून नळ व इतर दुसऱ्या वस्तूही चोरीला गेल्या आहेत. विक्कीला उद्या, शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय मेंढे, मुकुंद ठाकरे, पीएसआय प्रमोद खंडार, हवालदार शत्रुघ्न यादव, भगन शिंगणे, शंकर दीक्षित, शिपाई विनोद बरडे, बालकृष्ण राठोड, नितीन धकाते, सचिन जयपूरकर आणि आशिष लाकडे यांनी केली.