मुख्य भांडारात चोरीचा डाव उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:42+5:302021-07-10T04:07:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : अट्टल चाेरट्यांनी काेराडी येथील वीज केंद्रातील मुख्य भांडारात चाेरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : अट्टल चाेरट्यांनी काेराडी येथील वीज केंद्रातील मुख्य भांडारात चाेरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा डाव एफआयएसएस (फुल्ली इंटिग्रेटेड सिक्युरिटी सर्व्हिलन्स) यंत्रणेने उधळला. शिवाय, चाेरट्यांना पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना बुधवारी (दि. ७) मध्यरात्री घडली असून, शनिवारी (दि. ९) पाेलिसांनी तक्रार स्वीकारून प्रकरण तपासात घेतले.
‘एफआयएसएस’ यंत्रणेच्या कंट्राेल रूममध्ये बुधवारी रात्री कनिष्ठ सुरक्षा अधिकारी जयंतकुमार भातकुलकर कर्तव्यावर हाेते. त्यांना वीज केंद्राच्या मागच्या भिंतीवरून काही चोरटे आत प्रवेश करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी लगेच संबंधितांना माहिती देत चाेरट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यातच वीज केंद्राच्या मुख्य भांडाराकडे तिघे आढळून येताच सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. या तिन्ही चाेरट्यांची नावे मात्र कळू शकली नाहीत.
वीज केंद्राच्या परिसरातून लोखंड, भंगार चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले हाेते. येथील भंगार विकून पैसा कमावण्याचा काहींनी व्यवसाय सुरू केला आहे. वीज केंद्रातील राख वाहून नेणाऱ्या पाईप लाईन देखील चाेरीला गेल्या आहेत. चाेरट्यांच्या टाेळींनी सुरक्षा रक्षकांवर हल्ले केल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. या प्रकरणात काेराडी पाेलिसांनी काही कारणास्तव गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई केली आहे.
चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुरक्षा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक अनुराग शुक्ला यांनी दिली असून, पाेलिसात तक्रार देखील अनुराग शुक्ला यांनीच दाखल केली आहे. भांडारात महागडे साहित्य ठेवले असून, चाेरटे त्यावर हात साफ करतात. त्यामुळे माेठे नुकसान हाेते. ‘एफआयएसएस’ यंत्रणेमुळे चाेरट्यांवर लक्ष ठेवणे साेपे झाले असल्याची माहिती वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी दिली.
...
‘एफआयएसएस’ यंत्रणेचे स्वरूप
या वीज केंद्राच्या भांडार व परिसरात छाेट्यामाेठ्या चाेरीच्या घटना सामान्य झाल्या हाेता. या घटनांना आळा घालण्यासाठी वीज केंद्र प्रशासनाने सहा महिन्यापूर्वी ‘एफआयएसएस’ यंत्रणा बसविली. यात ३५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. या यंत्रणेनेद्वारे वीज केंद्राच्या चारही बाजूकडील बाहेरील भागांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. त्यासाठी नियंत्रण कक्ष तयार केला असून, तिथे चार सुरक्षा कामगारांची २४ तास नियुक्ती केली आहे.