नागपुरात महिला वकिलाच्या सदनिकेत धाडसी चोरी :१२ लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 09:39 PM2019-02-01T21:39:53+5:302019-02-01T21:42:31+5:30
रामदासपेठेतील एका महिला वकिलाच्या सदनिकेतून चोरट्याने १२ लाखांची रोकड चोरून नेली. ३० डिसेंबर ते २३ जानेवारीदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. मात्र, उशिरा तक्रार मिळाल्याने या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी चोरीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामदासपेठेतील एका महिला वकिलाच्या सदनिकेतून चोरट्याने १२ लाखांची रोकड चोरून नेली. ३० डिसेंबर ते २३ जानेवारीदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. मात्र, उशिरा तक्रार मिळाल्याने या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी चोरीचा गुन्हा दाखल केला.
अॅड. नंदिता रवींद्र त्रिपाठी (वय ४४) असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. त्या उच्च न्यायालयात वकिली करतात. रामदासेपेठेतील वंदना हाऊसिंग सोसायटीत ई-२ मध्ये त्यांची सदनिका आहे.
त्यांच्या वडिलांना हृदयविकार होता. त्यांच्या उपचारासाठी त्यांनी घर घेण्यासाठी जमा केलेले १२ लाख रुपये आपल्या सदनिकेत आणून ठेवले होते. दरम्यान, त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्या त्यांच्या भावासोबत गोव्याला गेल्या होत्या. तेथे काही दिवस राहिल्यानंतर त्या परत आल्या. २४ जानेवारीला त्यांनी शयनकक्षात ठेवलेली पैश्याची बॅग तपासली असता ती दिसली नाही. घरातील मंडळींकडे विचारणा केली असता त्यांनी अनभिज्ञता दर्शविली. त्यामुळे अॅड. त्रिपाठी यांनी सीताबर्डी पोलिसांकडे चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात तीन दिवस चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेजही तपासले. त्या ज्यावेळी गोव्याला गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्या सदनिकेत त्यांचे पती राहायचे आणि घरकाम करण्यासाठी मोलकरीण यायची. ही मोलकरीण अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे काम करते. ती अत्यंत विश्वासातील आहे. मात्र, प्रकरण १२ लाखांच्या चोरीचे असल्यामुळे पोलिसांनी त्या महिलेला ठाण्यात आणून तिची प्रदीर्घ चौकशी केली. परंतु पोलिसांना संशयास्पद असे काही जाणवले नाही. त्यामुळे महिलेला सोडून देण्यात आले. या प्रकरणात गुरुवारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.