फायनान्स कंपनीतील चोरीचा पर्दाफाश

By admin | Published: August 3, 2016 02:41 AM2016-08-03T02:41:44+5:302016-08-03T02:41:44+5:30

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सोमवारी पहाटे झालेल्या धाडसी चोरीचा अवघ्या आठ तासात छडा लावण्याची

Thefts stolen from the finance company | फायनान्स कंपनीतील चोरीचा पर्दाफाश

फायनान्स कंपनीतील चोरीचा पर्दाफाश

Next

सव्वादहा लाख जप्त : तिघांना अटक, गुन्हेशाखेची कामगिरी
नागपूर : फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सोमवारी पहाटे झालेल्या धाडसी चोरीचा अवघ्या आठ तासात छडा लावण्याची प्रशंसनीय कामगिरी गुन्हेशाखेच्या पथकाने बजावली. याप्रकरणी तिघांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून १० लाख, १९ हजारांची रोकड जप्त केली. आकाश संजय आगुलवार (वय २२), सचिन रामचंद्र शरणागत (वय २५, दोन्ही रा. रामेश्वरी हनुमान मंदिराजवळ) आणि रोहित संदीप दुधे (वय २४, रा. रामेश्वरी पार्वतीनगर, अजनी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यातील आगुलवार आणि शरणागत अट्टल घरफोडे आहेत. गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी मंगळवारी दुपारी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी उपायुक्त रविंद्र परदेशी उपस्थित होते.
कामठी मार्गावर गिरीश हाईटस् नामक बहुमजली इमारतीत एचबीडी फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. मध्यरात्री या कार्यालयाच्या बालकनीच्या ‘स्लायडिंग विंडो’ची चिटकणी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि आतमधील तिजोरी फोडून त्यातील रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास सफाई कर्मचारी कार्यालयात आला. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर कंपनीचे अधिकारी स्वप्नील सतीश कोल्हटकर (वय ४९) यांनी सदर पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी सदर ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केल्यानंतर सदर ठाण्यातील पोलिसांसोबतच गुन्हेशाखेची पथकेही चौकशी करू लागली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असलेल्या आरोपीचे वर्णन पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका घरफोडीच्या आरोपीशी मिळतेजुळते असल्यामुळे गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आपल्या सहकाऱ्यांना त्याचा शोध घेण्यास सांगितले. संशयित आरोपीला ताब्यात घेत बोलते केले असता त्याने लगेच या धाडसी घरफोडीची कबुली दिली. शिवाय अन्य दोन साथीदारांचीही नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच तीनही आरोपींना अटक केली.
त्यांनी लपवून ठेवलेले एकूण १० लाख १९ हजार, ५०० रुपये जप्त केले. घटनास्थळ आणि आपल्या घराचे अंतर बघता पोलीस आपल्यापर्यंत पोहचूच शकणार नाही, असा आरोपींना विश्वास होता. त्यामुळे एवढा मोठा गुन्हा करूनही ते सोमवारी दिवसभर बिनधास्त फिरत होते.
मात्र, त्यांना अटक करून मुद्देमाल मिळवण्यात पोलिसांना यश मिळाल्याची माहिती शर्मा यांनी पत्रकारांना दिली. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त रवींद्र परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, हवलदार सुरेश हिंगणेकर, शत्रुघ्न कडू, शैलेश ठवरे, नायक अतुल दवंडे, मंगेश लाडे, मनीष भोसले, शिपाई शरिफ शेख, बादल मांढरे तसेच सदरचे ठाणेदार मनोज सिडाम आणि सहायक निरीक्षक घोडेपाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली. (प्रतिनिधी)

रोहित दुधेच्या टीपवरून चोरी
या धाडसी चोरीचा टिपर (टीप देणारा) रोहित दुधे आहे. तो कुरियरचे काम करतो. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत तो या कार्यालयात नेहमी जात होता. त्यामुळे त्याला कार्यालयातील अंतर्गत रचना आणि व्यवहाराची माहिती होती. त्यानेच आगुलवार आणि शरणागतला ही माहिती देऊन धाडसी चोरीचा कट रचला. घटनेपूर्वी तो कार्यालयाबाहेर होता. तर, आरोपी आतमध्ये होते.

 

Web Title: Thefts stolen from the finance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.