प्रवाशांची दिवाळी गोड व्हावी म्हणून 'त्यांचे' समर्पण; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ५५० ट्रेन
By नरेश डोंगरे | Published: November 13, 2023 10:37 PM2023-11-13T22:37:24+5:302023-11-13T22:38:41+5:30
गाव-शहरात जाऊन सणोत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा ओढा वाढला आहे.
नरेश डोंगरे
नागपूर : ठिकठिकाणच्या नागरिकांना त्यांच्या आप्तस्वकियांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करता यावी म्हणून रेल्वेचे हजारो कर्मचारी ऐन सणासुदीच्या दिवसांत कोणतीही सुटी न घेता रात्रंदिवस सेवा देत आहेत.
कोरोनाचा धोका टळल्यानंतर आलेल्या दिवाळीपासून आपापल्या गाव-शहरात जाऊन सणोत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षांत सणोत्सवाच्या खास करून दिवाळीच्या सणाला देशाच्या प्रत्येकच भागात ईकडून तिकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असते. परिणामी रेल्वे गाड्यांमध्ये झुंबड बघायला मिळते. ती लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपासून विशेष नियोजन केले आहे. सणासुदीच्या काळात गेल्या वर्षी मध्य रेल्वेने २७० रेल्वेगाड्या चालविल्या होत्या. यंदा मात्र नियमित मेल, एक्सप्रेस व्यतिरिक्त ५०९ फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन चालविल्या आहेत. त्यातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशीपर्यंत ७ लाख, ५० हजार प्रवाशांची अतिरिक्त वाहतूक रेल्वेने केली आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ५५० ट्रेन
रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मध्य रेल्वेने ३७१ मेल एक्सप्रेस गाड्या, १३३ प्रवासी गाड्या आणि ४६ उत्सव विशेष अर्थात फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन अशा एकूण ५५० ट्रेनची प्रवाशांना सेवा दिली.
त्यांची रांत्रदिवस सेवा
मोटरमन, लोकोपायलट, ट्रेन मॅनेजर, नियंत्रक, स्टेशन मास्तर, टीटीई, आरपीएफ जवान, पॉइंट्समन, बुकिंग कर्मचारी, ट्रॅकमन, ट्रेन परिक्षण कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी रात्रंदिवस प्रवाशांना सेवा देत आहेत.