अपत्यांची जबाबदारी केवळ वडिलांची नाही
By admin | Published: October 29, 2016 02:20 AM2016-10-29T02:20:07+5:302016-10-29T02:20:07+5:30
विभक्त झालेले वडील व आई हे दोघेही नोकरी करीत असल्यास अपत्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी केवळ वडिलांवर टाकता येणार नाही.
हायकोर्टाचे निरीक्षण : आईनेही द्यायला हवे योगदान
राकेश घानोडे नागपूर
विभक्त झालेले वडील व आई हे दोघेही नोकरी करीत असल्यास अपत्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी केवळ वडिलांवर टाकता येणार नाही. आईनेही त्यात आर्थिक योगदान द्यायला हवे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व इंदिरा जैन यांनी हा निर्णय दिला आहे.
प्रकरणातील वडील मनोज व आई उर्मिला यांना १० वर्षांचा मुलगा व ९ वर्षांची मुलगी आहे. मनोज व उर्मिला यांचे २६ आॅक्टोबर १९९७ रोजी लग्न झाले होते. सध्या ते विभक्त झाले असून, दोन्ही मुले उर्मिलासोबत राहात आहेत. उर्मिला व मुलांनी मनोजकडून पोटगी मिळण्यासाठी नागपूर कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ३० नोव्हेंबर २००९ रोजी कुटुंब न्यायालयाने उर्मिलाला पोटगीसाठी अपात्र तर, मुलांना पात्र ठरविले होते. तसेच, दोन्ही मुलांना एकूण सात हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश मनोजला दिला होता. या निर्णयाविरुद्ध मनोजने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय लक्षात घेता, आई व वडील नोकरीवर असल्यास त्या दोघांनीही अपत्यांच्या पालनपोषणासाठी आर्थिक उत्पन्नाच्या आधारे योगदान द्यायला हवे, असे स्पष्ट करून कुटुंब न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशात बदल केला. दोन्ही अपत्यांना मनोजने एकूण पाच हजार रुपये मासिक पोटगी द्यावी व उर्वरित खर्च उर्मिलाने सोसावा, असे नवीन आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
आई व वडील आहेत लघुलेखक
प्रकरणातील आई उर्मिला तृतीय श्रेणीची तर, वडील मनोज द्वितीय श्रेणीचे लघुलेखक आहेत. न्यायालयासमक्ष करण्यात आलेल्या दाव्यानुसार दोघांचेही वेतन १५ ते १६ हजारादरम्यान आहे. उर्मिलाचे वेतन थोडे कमी आहे. यामुळे उच्च न्यायालयाने उर्मिलावर अपत्यांच्या पालनपोषणाचा कमी भार टाकला आहे.