...तर एसीपी सुपारेंना करणार आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 08:37 PM2018-04-21T20:37:45+5:302018-04-21T21:22:43+5:30
कांबळे दुहेरी हत्याकांडाचा तपास योग्यरीत्या न करणे किंवा आरोपींना मदत करून पीडितांना त्रास दिल्याप्रकरणी दोष सिद्ध झाला तर अॅट्रॉसिटी कायदा (कलम) ४ अंतर्गत तत्कालीन तपास अधिकार एसीपी किशोर सुपारे यांना आरोपी करण्यात येईल, अशी माहिती अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांनी शनिवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कांबळे दुहेरी हत्याकांडाचा तपास योग्यरीत्या न करणे किंवा आरोपींना मदत करून पीडितांना त्रास दिल्याप्रकरणी दोष सिद्ध झाला तर अॅट्रॉसिटी कायदा (कलम) ४ अंतर्गत तत्कालीन तपास अधिकार एसीपी किशोर सुपारे यांना आरोपी करण्यात येईल, अशी माहिती अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांनी शनिवारी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात शनिवारी थूल यांनी अनुसूचित जाती-जमातीशी संबंधित तक्रारींवर सुनावणी घेतली. यावेळी कांबळे दुहेरी हत्याकांडाचा आढावाही घेतला. यावेळी उपायुक्त नीलेश भरणे यांनी आयोगाला प्रकरणाशी संबंधित माहिती दिली. यावर आयोगाकडून नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यानंतर थूल यांनी कांबळे कुटुंबीयांच्या घरी भेट दिली. त्यांच्याकडून माहिती घेतली, नंतर घटनास्थळांना भेट दिली. यावेळी उपायुक्त नीलेश भरणे उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, पीडित पत्रकार रविकांत कांबळे यांनी केलेली तक्रार मिळाली. तत्कालीन तपास अधिकारी एसीपी यांनी प्रकरण योग्यरीत्या हाताळले नाही, असे त्यात नमूद होते. पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून यासंदर्भातील खुलासा करण्यास सांगण्यात येणार आहे. पीडित, साक्षीदार, पोलीस अधिकाऱ्यांची पुन्हा सुनावणी घेण्यात येईल. सुपारेंनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी सर्वच पुरावे काही नष्ट होत नाही. सुनावणीत ते नव्याने समोर येतील. सुपारे यांचा दोष सिद्ध झाल्यास या प्रकरणात त्यांनाही आरोपी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. अॅट्रॉसिटीच्या कलम ४ नुसार आरोपी करून कलम २२ अंतर्गत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. एका चौकशी अधिकाऱ्याकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो, तर दुसऱ्या तपास अधिकाऱ्याकडून सर्व पुरावे गोळा करून न्याय देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणास आयोगाकडून गांभीर्याने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
असे आहे प्रकरण
आजी उषा व नात साक्षी कांबळे यांची फेब्रुवारी महिन्यात गणेश शाहू आणि इतरांनी घरीच हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतांचे शरीर नाल्यात फेकले. आरोपीच्या पत्नीने घरातील रक्ताचे डाग स्वच्छ केले. या गुन्ह्यात अॅट्रॉसिटी लागल्याने तपास एसीपी सुपारे यांच्याकडे आला. मात्र त्यांनी प्रकरणाची योग्यरीत्या तपासणी केली नसून, आरोपींना मदत केल्याचा आरोप कांबळे कुटुंबीयांनी केला आहे.