...तर नगरसेवकांवर होईल कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:05 AM2018-09-12T00:05:59+5:302018-09-12T00:06:54+5:30
ज्या नगरसेवकांच्या घरात डासांचा लार्वा आढळून आला आहे त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडले जाणार नाही. नियम सर्वांसाठी सारखा असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती मनोज चाफले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या नगरसेवकांच्या घरात डासांचा लार्वा आढळून आला आहे त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडले जाणार नाही. नियम सर्वांसाठी सारखा असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती मनोज चाफले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली असता, लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे यांच्यासह भाजपा नगरसेवकांच्या घरात डासांचा लार्वा आढळून आल्याचा आरोप आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने महापौर नंदा जिचकार यांच्या बैठकीत केला होता. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच प्रशासनात खळबळ उडाली होती.
मधुमेहावर व्याख्यान कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला मनोज चाफले उपस्थित होते. पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तरात चाफले म्हणाले, डेंग्यू व स्क्रब टायफस नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. डेंग्यूवर विशेष औषध नाही. मात्र स्क्रब टायफसवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा पुरेसा साठा आहे. डासांचा लार्वा आढळून आल्यास नोटीस बजावली जाते. एखाद्या नगरसेवकाच्या घरात लार्वा आढळून आल्यास सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनाही नोटीस बजावली जाते. पावसाने सात ते आठ दिवसांची उघाड दिली की लार्वा डास बनतात. लोकांना जागृत करण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. दंड आकारण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.