तो मृतदेह सहायक उपनिरीक्षकाचा
By admin | Published: August 19, 2015 02:59 AM2015-08-19T02:59:46+5:302015-08-19T02:59:46+5:30
रविवारी सायंकाळी जरीपटक्यातील नाल्यात आढळलेला मृतदेह सहायक पोलीस उपनिरीक्षकांचा (एएसआय) असल्याची माहिती उघड झाली आहे.
नागपूर : रविवारी सायंकाळी जरीपटक्यातील नाल्यात आढळलेला मृतदेह सहायक पोलीस उपनिरीक्षकांचा (एएसआय) असल्याची माहिती उघड झाली आहे. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गिट्टीखदानमधील नाल्याला आलेल्या पुरात ते वाहून गेल्याचा अंदाज बांधला जात आहे.
देवीशंकर शुक्ल मिश्रा (वय ५५) मृत एएसआयचे नाव असून ते गिट्टीखदानमधील एकता नगरात राहात होते. त्यांचा मुलगा कोतवाली ठाण्यात कार्यरत आहे. मुख्यालयात कर्तव्याला असलेले शुक्ला १३ आॅगस्टला रात्री घरी परतले. त्यांना एक फोन आला. त्यामुळे मित्राला भेटून येतो आणि तिकडूनच भाजी घेऊन येतो, असे सांगून ते घराबाहेर पडले. नंतर ते परतलेच नाही. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे चौकशी केली. काहीच माहिती न कळल्यामुळे गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बेपत्ताची नोंद केली. १६ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांनी पूरपीडिताना जरीपटक्यात आर्थिक मदत वितरीत केली तर, याच दिवशी शुक्लांचा मृतदेह आढळला. (प्रतिनिधी)