...तोपर्यंत उमरेडमधील ३८४ बूथची मतमोजणी करण्यात येऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 09:01 PM2019-04-26T21:01:23+5:302019-04-26T21:03:58+5:30

रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रूममधील डीव्हीआर आणि सीसीटीव्हीची चोरी ही ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठीच करण्यात आली आहे, असा आमचा दाट संशय आहे. तेव्हा डीव्हीआरमधील रेकॉर्डिंग व सीसीटीव्हीचे फुटेज उमेदवार म्हणून मला उपलब्ध करण्यात यावेत. ते उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत उमरेड विधानसभा मतदार संघातील ३८४ बुथवरील मतमोजणी करण्यात येऊ नये, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि गरज पडली तर पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

... By then the counting of 384 booths in Umred should not be counted | ...तोपर्यंत उमरेडमधील ३८४ बूथची मतमोजणी करण्यात येऊ नये

...तोपर्यंत उमरेडमधील ३८४ बूथची मतमोजणी करण्यात येऊ नये

Next
ठळक मुद्देडीव्हीआर-सीसीटीव्ही चोरी प्रकरण : रामटेकमधील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रूममधील डीव्हीआर आणि सीसीटीव्हीची चोरी ही ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठीच करण्यात आली आहे, असा आमचा दाट संशय आहे. तेव्हा डीव्हीआरमधील रेकॉर्डिंग व सीसीटीव्हीचे फुटेज उमेदवार म्हणून मला उपलब्ध करण्यात यावेत. ते उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत उमरेड विधानसभा मतदार संघातील ३८४ बुथवरील मतमोजणी करण्यात येऊ नये, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि गरज पडली तर पुन्हा मतदान घेण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
किशोर गजभिये यांनी सांगितले की, ११ तारखेला मतदान शांततेत पार पडले. रात्रीपर्यंत सर्व ईव्हीएम उमरेड येथील स्ट्राँग रुममधून कळमन्यातील मतमोजणीच्या ठिकाणी रवाना झाले. १२ एप्रिल रोजी उमरेड येथील आयटीआय परिसरात असलेल्या स्ट्राँग रुममधून एक डीव्हीआर डिजीटल व्हीडिओ रेकॉर्डिंंग, दोन एलसीडी संच चोरी झाल्याचे उघडकीस आले. २५ एप्रिल रोजी आम्ही आमच्या वतीने एक चौकशी पथक उमरेडला पाठवले. त्यांनी केलेल्या चौकशीनंतर काही गोष्टी उघडकीस आल्या. त्या म्हणजे चोरीची घटना घडून १२ दिवस उलटून गेल्यावरही उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश लोंढे यांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही. डिजिटल व्हीडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) मध्ये ईव्हीएम व कंट्रोल युनिट स्ट्राँग रुममध्ये ठेवत असतांना संपूर्ण प्रक्रियेचे रेकॉर्डिंग आणि ईव्हीएम सुरक्षित ठेवले असल्याचा पुरावा रेकॉर्डिंड असतो. एवढी महत्त्वाची बाब चोरीला गेली असताना स्थानिक पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. किंवा वरिष्ठांना अहवाल सुद्धा पाठविलेला नाही. सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चोरीला गेलेले साहित्य महत्त्वपूर्ण नसल्याचे सांगून प्रशासनाची व जनतेची दिशाभूल केलेली आहे.
या संपूर्ण प्रकरणात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश लोंढे यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांच्या आचरणाची व वर्तणुकीची चौकशी करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी व कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही किशोर गजभिये यांनी केली.
पत्रपरिषदेला नागपूरचे उमेदवार नाना पटोले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, शहराध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, अभिजित वंजारी, नाना गावंडे, संजय मेश्राम, त्रिशरण सहारे आदी उपस्थित होते.
शहरातील प्रत्येक मतदान केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रेकॉर्डिंग मिळावी
काँग्रेसचे नागपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार नाना पटोले यांनी यावेळी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला. या निवडणुकीत ८५ टक्के मतदान व्हायला हवे होते. नियमानुसार मतदार यादी पाच दिवसापूर्वी लोकांपर्यंत पोहोचायला हवी परंतु ती वाटण्यातच आली नाही. याप्रकरणात आपण एकूण ३२ तक्रारी केल्या आहेत. न्यायालयापर्यंतही गेलो आहोत. नागपुरातील मतदान केंद्रांमधून कळमन्याच्या स्ट्राँग रुमपर्यंत ईव्हीएम पोहोचायला ४८ तास लागले तर रामटेकमधील ईव्हीएम मात्र अगोदरच पोहोचल्या. यामुळे संशय निर्माण होतो. त्यामुळे शहरातील प्रत्येक मतदान केंद्रातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची रेकॉर्डिंग आपल्याला उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

Web Title: ... By then the counting of 384 booths in Umred should not be counted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.