...तर देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल

By admin | Published: July 13, 2017 02:52 AM2017-07-13T02:52:43+5:302017-07-13T02:52:43+5:30

महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात आपल्या कृतीतून भेदभाव न पाळण्याची शिकवण दिली होती

... then the country will be repatriated again | ...तर देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल

...तर देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल

Next

 सुधीर गव्हाणे : विद्यापीठात महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात आपल्या कृतीतून भेदभाव न पाळण्याची शिकवण दिली होती. देवा धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसाचाराला त्यांनी अवडंबर संबोधले होते. डॉ. बाबासाहेब आंंबेडकरांनी तर समानता व सामाजिक न्यायासाठी मोठी लढाई लढली आहे. जाती, धर्मापेक्षा देशाला श्रेष्ठ मानले व सांस्कृतिक आदर बाळगण्याचे आवाहन केले. मात्र समाज आज त्यांचे परिवर्तनाचे विचार स्वीकारतो काय, याचा विचार करण्याची वेळ आहे. देशापेक्षा जाती, धर्माला श्रेष्ठ मानले तर हा देश पुन्हा पारतंत्र्यात गेल्याशिवाय राहणार नाही, असे विचार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने दादा मनोहरराव कल्लावार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महात्मा बसवेश्वर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त ‘महात्मा बसवेश्वर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर : परिवर्तन लढ्याची उपयुक्तता’ या विषयावर डॉ. गव्हाणे यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, शिवा अ.भा. वीरशैव युवक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कल्लावार प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. गव्हाणे म्हणाले, तथागत बुद्धानंतर बसवेश्वरापासून डॉ. आंबेडकरांपर्यंत अनेक महापुरुषांनी जुनी विषमतावादी जातीव्यवस्था मोडकळीस आणून नवीन समतावादी व परिवर्तनवादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्य पणाला लावले. मात्र त्यांचे भक्त म्हणवणारी आजची पिढी त्यांचे दैवतीकरण करून परिवर्तनवादी विचारांपासून फारकत घेत आहे. आज जगभरात समान संधी, समान रोजगार, समान शिक्षण यांसाठी योजना आखल्या जात आहेत. म्हणून आजही या महामानवांच्या विचारांची गरज आहे. अशावेळी त्यांना जातींच्या भिंतीत बांधणे योग्य नाही. महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांनी जातीविरहित समाज व राष्ट्राची कल्पना मांडली. मात्र त्यांनाच गटागटात विभागून आपण चौकटीत बंदिस्त करतोय का? अशा चौकटीतून आपणच चातुर्वर्ण्याची शोषण व्यवस्था निर्माण करीत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांना अधिकार देण्याचा प्रयत्न केला. अध्यात्मासोबत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या अधिकारासाठी मंत्रिपदाला ठोकर मारली. आज स्त्रियांना समानतेने लेखले जाते का, असा सवाल करीत घडणाऱ्या परिवर्तनाकडे डोळस नजरेने पाहण्याची वेळ आल्याचे मत डॉ. गव्हाणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले.प्रास्ताविक अभय कल्लावार यांनी केले.

म्हणून जातीभेदाचा आजार कायम : कुलगुरू
जातीभेद हा भारतीय समाजाला हजारो वर्षांपासून झालेला आजार आहे. महात्मा बसवेश्वरापासून ते अनेक महापुरुष व संत महात्म्यांनी या आजाराचे निदान केले आणि तो बरा करण्याचे उपाय सुचविले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या डॉक्टरांना या आजारावर उपचार करण्याची महत्त्वाची संधी मिळाली. त्यांनी आपल्या बुद्धीने आणि कर्तृत्वाने या संधीचे सोने केले. त्यांनी सुरुवातीला औषधोपाचार केले. त्यानंतर मात्र त्यांनी संविधानाच्या रूपाने समाजाला लागलेल्या या आजारावर थेट ‘सर्जरी’च केली. त्यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वीही ठरली. मात्र आजार बरा व्हावा अशी ‘पेशंट’चीच मानसिकता नसल्याने या आजाराचे पडसाद आजही कायम आहेत, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.

Web Title: ... then the country will be repatriated again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.