...तर घडले असते एन्काउंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:35+5:302021-06-05T04:07:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रश्न सहा जिवांचा होता. त्यात एक वृद्धा अन् एक लहानगाही होता. दोन सुस्वरूप मुलीही ...

... then an encounter would have happened | ...तर घडले असते एन्काउंटर

...तर घडले असते एन्काउंटर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रश्न सहा जिवांचा होता. त्यात एक वृद्धा अन् एक लहानगाही होता. दोन सुस्वरूप मुलीही होत्या अन् आरोपी खतरनाक भूमिकेत होता. त्यामुळे प्रसंगी एन्काउंटर करायची वेळ आली तरी चिंता करायची नाही, अशी मानसिकता गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी बनविली होती. आरोपीला सहा लाख रुपये देऊनही तो बाहेर येण्याचे सोडा, खिडकीतून पूर्ण हातही बाहेर काढत नव्हता. त्यामुळे त्याच्या तावडीतील महिला, मुली आणि लहानग्याची सुटका कशी करावी, असा पोलिसांना प्रश्न पडला होता.

चांगले धावपटू आणि कुस्तीगीर असलेल्या पोलीस उपायुक्त राजमाने ‘ऑन द स्पॉट प्लॅन’ बनविला. दोन सहायक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस कर्मचारी सोबत घेऊन राजमाने थेट दुसऱ्या माळ्यावर शिरले. तेथून त्यांनी जिन्यावरून खाली उतरून आधी पहिल्या माळ्यावर आरोपीच्या धाकाने स्वत:ला कोंडून घेणाऱ्या वैद्य कुटुंबातील एक महिला, मुलगी अन् लहानग्याला आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने वरून सुखरूप खाली उतरवले. त्यानंतर त्यांनी तळमाळा गाठला. त्यांच्याकडे दोन लोडेड पिस्तूल होत्या. आरोपी दोन तासांपासून वृद्ध महिला आणि मुलीला कधी चाकू लावत होता, तर कधी पिस्तूल (लायटर गण) ताणत होता. त्यांचा जीव धोक्यात असल्यामुळे राजमाने यांनी व्हेंटिलेटरमधून त्याच्यावर फायरिंग करण्याचा विचार केला. मात्र, गोळी थेट गेली नाही, तर ती आरोपीऐवजी महिला, मुलीलाच धोका पोहोचवू शकते, हे ध्यानात आल्याने त्यांनी तो विचार टाळला. नंतर बेमालूमपणे दाराची चिटकणी उघडली अन् थेट आरोपी जितेंद्र बिसनेवर झडप घातली. त्याला धोबीपछाड दिला अन् त्यांच्या मागोमाग दोन सहायक निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्याने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याला खाली आणले अन् एका थरारनाट्याचा अंक संपला.

---

अनेक दिवसांपासून तयारी

आरोपी हुडकेश्वर भागातच राहतो. तो नववी पास आहे. बिल्डर वैद्य मोठे प्रस्थ आहे. त्याच्याकडून सहज ५० लाख मिळतील, असा अंदाज बांधून त्याने अनेक दिवसांपूर्वी या ओलिस नाट्याचा कट रचला अन् अखेर तो पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तो स्वत:च अडकला.

---

Web Title: ... then an encounter would have happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.