तर निवडणुकीत सरकारचे नाक दाबू : गोवारी समाजाचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:57 AM2018-11-24T00:57:55+5:302018-11-24T01:05:51+5:30

११४ शहीद गोवारी बांधवांच्या बलिदानाची दखल न्यायालयाने २४ वर्षानंतर घेतली. त्यामुळे वर्षानुवर्षे हक्कापासून वंचित राहणाऱ्या गोवारी समाजाला न्यायाची आस लागली. गोवारीवर झालेल्या अन्यायाला विराम मिळण्यासाठी फक्त एक पाऊल बाकी आहे. आता फक्त सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारींना अनुसूचित जातीत समावेश करण्यासंदर्भात अध्यादेश काढायचा आहे. ९० दिवस न्यायालयाचा निर्णय होऊन झाले आहे. मात्र सरकारच्या हालचाली मंदावल्या आहेत. मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गोवारींच्या संदर्भात निर्णय न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत गोवारी समाज सरकारचे नाक दाबल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा गोवारी समाजाने श्रद्धांजली सभेत दिला.

Then the government's nose clutched in the elections: Gowari community warns the government | तर निवडणुकीत सरकारचे नाक दाबू : गोवारी समाजाचा सरकारला इशारा

तर निवडणुकीत सरकारचे नाक दाबू : गोवारी समाजाचा सरकारला इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देश्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लाखो गोवारी बांधव स्मारकावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ११४ शहीद गोवारी बांधवांच्या बलिदानाची दखल न्यायालयाने २४ वर्षानंतर घेतली. त्यामुळे वर्षानुवर्षे हक्कापासून वंचित राहणाऱ्या गोवारी समाजाला न्यायाची आस लागली. गोवारीवर झालेल्या अन्यायाला विराम मिळण्यासाठी फक्त एक पाऊल बाकी आहे. आता फक्त सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारींना अनुसूचित जातीत समावेश करण्यासंदर्भात अध्यादेश काढायचा आहे. ९० दिवस न्यायालयाचा निर्णय होऊन झाले आहे. मात्र सरकारच्या हालचाली मंदावल्या आहेत. मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गोवारींच्या संदर्भात निर्णय न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत गोवारी समाज सरकारचे नाक दाबल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा गोवारी समाजाने श्रद्धांजली सभेत दिला. 


आदिवासी गोवारी समाज संघटना व श्रद्धांजली सभेचे आयोजक कैलास राऊत यांच्या अध्यक्षतेत श्रद्धांजली सभा घेण्यात आली. या सभेला आमदार डॉ. परिणय फुके, झेड. आर. दुधकवर, शालिक नेवारे, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे, हेमराज नेवारे, सुरेंद्र राऊत, दामोदर नेवारे, प्रभू काळसर्पे, संजय हांडे, विलास यसनसुरे, बबलू राऊत आदी उपस्थित होते. 

२४ एप्रिल १९८४ चा जी.आर. रद्द करून ‘गोंडगोवारी’ यात कॉमा द्यावा, या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाचा भव्य मोर्चा विधानभवनावर धडकला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मोर्चाला भेट द्यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती. मोर्चा त्यासाठी अडून बसला होता. मोर्चेकऱ्यांचा संताप वाढत होता, अशात पोलिसांकडून लाठीमार सुरू झाला. हवेत फायरिंग झाले. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले. या घटनेनंतर शासनाने गोवारी समाजाला एसबीसीमध्ये २ टक्के आरक्षण दिले पण त्यातही ३९ उच्च जातींचा 
समावेश केल्याने गोवारींना त्याचा फायदा झाला नाही. शासनाने शहीद गोवारी बांधवांच्या स्मृतीत झिरो माईल चौकात गोवारी शहीद स्मारक उभारले. दरवर्षी २३ नोव्हेंबरला विदर्भासह राज्यातील विविध भागातून गोवारी बांधव स्मारकावर येतात. चेंगराचेंगरीत शहीद झालेल्या आपल्या आप्तेष्टांना साश्रुनयनाने श्रद्धांजली अर्पण करतात आणि या घटनेच्या आठवणी मनात साठवून आपापल्या गावी परत जातात.

तर खरी श्रद्धांजली ठरेल 

न्यायालयाचा निकालानंतर गोवारी समाजाची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने गोवारी बांधव स्मारकावर आले होते. श्रद्धांजली कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार, काहीतरी घोषणा करणार अशी अपेक्षा गोवारी बांधवांना होती. अख्खा समाज स्मारक परिसरात एकवटला होता. पण काही कारणास्तव मुख्यमंत्री येऊ शकले नाही. मुख्यमंत्र्यांनी समाजबांधवांच्या अपेक्षा लक्षात घेता, लवकरात लवकर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास शहीद गोवारींना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी व्यक्त केली.

५० हजारावर गोवारी बांधवांनी दिली श्रद्धांजली 

२३ नोव्हेंबर हा दिवस गोवारी बांधव काळा दिवस म्हणून पाळतात. विदर्भातील कानाकोपऱ्यातून दुर्गम भागातून गोवारी बांधव नागपुरातील शहीद स्मारकावर पोहचतात. यावर्षी ५० हजारावर गोवारी बांधव स्मारकावर जमले होते. घटनास्थळी बांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली. अतिशय शांततेत साश्रुनयनाने शहिदांना नमन केले. घटनेच्या आठवणी ताज्या झाल्याने अनेकांचे डोळे पाणावले. पण समाज मौन होता. न्यायाच्या प्रतीक्षेत सरकारपुढे आपल्या भावना व्यक्त करून शांततेत आपापल्या गावी परतला.

गडकरींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्मारकस्थळी जाऊन ११४ शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधाकर कोहळे, गिरीश व्यास, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, गुड्डू त्रिवेदी, हाजी अब्दुल कादिर, अर्चना डेहणकर, रमेश वानखेडे, चंदन गोस्वामी यांच्यासह काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Then the government's nose clutched in the elections: Gowari community warns the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर