...तर नागपुरात कर्फ्यूसह लॉकडाऊन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:13 PM2020-07-22T21:13:06+5:302020-07-22T21:14:44+5:30
शहरात लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत, शहरात वाढता कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या यावरून ते स्पष्ट होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शहरात बाधितांचा आकडा हा १० हजारावर पोहचायला वेळ लागणार नाही. याचा विचार करता वेळ पडल्यास संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत, शहरात वाढता कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या यावरून ते स्पष्ट होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शहरात बाधितांचा आकडा हा १० हजारावर पोहचायला वेळ लागणार नाही. याचा विचार करता वेळ पडल्यास संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.
लॉकडाऊन करण्यापूर्वी २ ते ३ दिवस आधी याची माहिती दिली जाईल. लॉकडाऊन हा जवळपास १५ दिवसांचा असेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आहे असे म्हणता येणार नाही. कारण, अनलॉकिंगनंतर कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, ‘मिशन बिगीन अगेन’ ३ जूनला सुरू झाले. यानंतरची कोरोनाबाधित आणि मृत्यूसंख्या आणि यापूर्वीची बाधितांची आणि मृत्यूची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ३ जूनपूर्वी फक्त ११ जणांचा मृत्यू झाला. ४०० च्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्ण होते. आज शहरातील मरणाऱ्यांची संख्या ३७ झाली असून बाधितांचा आकडा २ हजार ३०० वर पोचला आहे. बाधितांचे प्रमाण पाच पटीने तर मरणाऱ्यांचे प्रमाण तीन पटीने वाढले आहे. नागरिक नियम पाळत नाहीत. आजाराची माहिती लपवतात, त्यामुळे मृत्यू वाढले. कुठेही नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी, वेळप्रसंगी आता केवळ लॉकडाऊनच नाही तर संचारबंदीदेखील लावण्यात येईल. अर्थात, नागरिकांना या दरम्यान बाहेर पडता येणार नाही, असेही ते म्हणाले.
जे नागरिक आजारी आहेत, ज्यांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होतोय त्यांनी स्वत:हून तपासून घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दोन तासात चार लाखांचा दंड वसूल
नागरिक नियम पाळत नाहीत, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढललेली आहे. नागरिकांनी नियम पाळावेत, शिस्त ठेवावी याकरिता रस्त्यावर उतरून कारवाई केली तेव्हा, केवळ दोन तासात चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला. अशी विद्यमान परिस्थिती आहे. नियमांचे उल्लंघन होत आहे.
- तर दहा हजाराहून अधिक रुग्ण होतील
नागपूर शहरात गेल्या काही दिवसात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात न आल्यास रुग्णांची संख्या १० हजाराच्या पुढे जाईल, असा इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला.
लॉकडाऊनची पूर्वसूचना दिली जाईल
लॉकडाऊनचे नियम दुकानदार,ऑटोरिक्षाचालक, दुचाकी, चारचाकी वाहनचालक आणि नागरिक पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. शहरासाठी असे वर्तन हानिकारक आहे. त्यामुळे प्रसंगी कडक संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात येईल. याबाबत दोन दिवसांपूर्वी माहिती दिली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.