-तरीही नागपूर शहराला स्मार्ट करू
By Admin | Published: February 26, 2016 03:05 AM2016-02-26T03:05:17+5:302016-02-26T03:05:17+5:30
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत काही तांत्रिक कारणामुळे २० शहरांच्या पहिल्या यादीत नागपूरचा समावेश झाला नाही.
मुख्यमंत्र्यांची घोषणा : स्मार्ट सिटीसाठी राज्य सरकार देईल निधी
नागपूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत काही तांत्रिक कारणामुळे २० शहरांच्या पहिल्या यादीत नागपूरचा समावेश झाला नाही. असे असले तरीही नागपूर शहराला स्मार्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपूरसह अमरावती, औरंगाबाद व कल्याण-डोंबिवली आदी महापालिकांना स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्याचा केंद्राकडून अपेक्षित असलेला निधी राज्य सरकार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. दक्षिण नागपुरातील हनुमान मंदिराच्या प्रागंणात आयोजित भाजपच्या दक्षिण नागपूर कार्यकारिणीची घोषणा व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे व भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, उपेंद्र कोठेकर, संदीप जोशी आदी व्यासपीठावर होते. यावेळी दक्षिण नागपूरचे अध्यक्ष संजय ठाक रे यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली.
फडणवीस व गडकरी यांच्या नेतृत्वातील भाजपला कोणीही रोखू शकत नाही. पुढील निवडणुकीत भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केला. कृष्णा खोपडे यांनीही काँग्रेसवर सडकून टीका केली. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, कैलास चुटे, बळवंत जिचकार, नीता ठाकरे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी किशोर पालांदूरकर, महेंद्र राऊ त, राजेश बागडी, डॉ. रवींद्र भोयर, श्रीकांत देशपांडे, भोजराज डुंबे, सतीश होले, रिता मुळे, दिव्या घुरडे, स्वाती आखतकर आदी व्यासपीठावर होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेसला जनता माफ करणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत असताना जेएनयूमध्ये एका कार्यक्रमात अफजल गुरू जिंदाबादचे नारे लावले जातात. भारत तोडण्याची भाषा केली जाते. असे देशविघातक कृत्य करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सत्कार करावा की त्यांना तिहारमध्ये पाठवावे, याचा निर्णय जनता घेईल. भारताचा विरोध केला तर काँग्रेसला जनता माफ करणार नाही, असा इशारा महापौर प्रवीण दटके यांनी दिला.पुढील वर्षात महापालिकेच्या निवडणुका आहेत. दक्षिण नागपुरातून २० नगरसेवक निवडून येतील, यासाठी तयारीला लागा, असे आवाहन प्रवीण दटके यांनी केले.महापालिकेच्या स्थायी समितीच्या माध्यमातून ४५ कोटींची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून गेल्या २५ वर्षांत शक्य न झालेला विकास करू. पाच वर्षांत दक्षिण नागपूरचा कायापालट करण्याची ग्वाही सुधाकर कोहळे यांनी दिली.