... तर मोदी, शहा यांचे गोध्रा प्रकरण उघडू, छगन भुजबळ यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 05:57 AM2019-04-05T05:57:12+5:302019-04-05T05:57:37+5:30
छगन भुजबळ यांचा पलटवार : तिहारची भीती दाखविणे हा दमबाजीचा प्रकार
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सीबीआय, ईडी व पोलीस अशा तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना गप्प करण्यासाठी करीत आहेत. त्यांनी वर्धा येथील प्रचार सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार कारागृहाची भीती दाखविणे, हा असाच दमबाजीचाच प्रकार आहे. मात्र, मोदी- शहा यांचेही गोध्रा प्रकरण ‘रिओपन’ होऊ शकते, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी केला.
पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, सीबीआय, ईडी अशा तपास यंत्रणांचा वापर विरोधक व प्रसार माध्यमांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, पी. चिदंबरम यांच्यासह प्रसार माध्यमांच्या विरोधात या यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात गोध्रा प्रकारणात केसेस आहेत . न्यायाधीश लोया प्रकरणही ताजे आहे. अशी प्रकरणे रिओपन होऊ शकतात. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सर्वात शक्तिशाली नेते असल्याचे मोदी यांनीही मान्य केले आहे. म्हणूनच त्यांना टार्गेट केले जात आहे. मात्र मोदी शेतकरी आत्महत्या, नोटाबंदी, दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख हे मुद्दे सोडून दुसऱ्याच्या घरात काय सुरू आहे, हे बघण्यातच धन्यता मानत असल्याचा चिमटाही भुजबळ यांनी काढला.
काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अभ्यास केल्यानंतरच या मुद्याचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला. त्यामुळे काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यास या आश्वासनाची पूर्तता होईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. मनसेचे नेते राज ठाकरे हे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी ८ ते ९ प्रचार सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.