-तर रेशन दुकानदाराचा परवाना होणार रद्द : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:29 AM2020-03-29T00:29:47+5:302020-03-29T00:31:14+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने नागरिकांना ३ महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदारांकडे मुबलक धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जे दुकानदार धान्य वाटप करणार नाहीत, स्टॉक नाही, अशी कारणे सांगतील त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने नागरिकांना ३ महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदारांकडे मुबलक धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जे दुकानदार धान्य वाटप करणार नाहीत, स्टॉक नाही, अशी कारणे सांगतील त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
याशिवाय शिधापत्रिकाधारकांना आता बोटाचे ठसे देण्याची गरज पडणार नाही. १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. सर्व आस्थापना बंद असल्याने गरिबांच्या हातात पैसा राहणार नाही, म्हणून गरिबांच्या बँक खात्यामध्ये सरकार पैसा टाकणार असल्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यात स्वस्त धान्याची जवळपास १२०० वर दुकाने असून, ७ लाखांवर कार्डधारक आहेत. तर ३० लाखांवर लाभार्थी आहेत. पूर्वी रेशनची दुकाने ही काही ठराविक वेळेसाठीच उघडी राहत होती. मात्र आता या काळामध्ये ही दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेमध्ये खुली राहणार आहेत. ग्राहकांना तीन महिन्याचा धान्य पुरवठा होणार असल्याने दुकानदारांनाही शासनाकडे तीन महिन्याचे चालान भरावे लागणार आहे. ज्या दुकानदारांकडे तीन महिन्याचे चालान भरण्याइतके पैसे नसतील, त्यांना शासनाकडून क्रेडिट मिळणार आहे. यानंतर पुढील महिन्यात सदरचे पैसे त्यांच्याकडून समायोजित केले जाणार आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता शासनाकडून धान्य दुकानांमध्ये रेशनचा पुरवठा करण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये रेशन वितरणालाही सुरुवात झाली आहे. तर शहरी भागामध्ये येत्या १ एप्रिलपासून धान्य वितरणाला सुरुवात होणार आहे.
असे मिळणार रेशन
प्रत्येक रेशनकार्ड धारकांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू २ रुपये प्रति किलो दराने, तांदूळ ३ रुपये किलो दराने प्रति व्यक्ती २ किलो मिळणार आहेत. तर तूरडाळ ५५ रुपये किलो प्रमाणे १ किलो, तर साखर २० रुपये दराने १ किलो वितरण होणार आहे.
शहरातील व ग्रामीण भागातील जवळपास सर्वच रेशन दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. दुकानदारांनी ग्राहकांना तीन महिन्याचे धान्य एकाचवेळी द्यावयाचे आहे. जो दुकानदार धान्य देण्यास नकार देणार अशांचा परवानाही रद्द करण्यात येईल.
भास्कर तायडे, अन्नधान्य वितरण अधिकारी