‘तो’ आरोपी प्राध्यापक निलंबित
By admin | Published: April 25, 2017 01:46 AM2017-04-25T01:46:56+5:302017-04-25T01:46:56+5:30
धरमपेठ पॉलिटेक्निक कॉलेज येथील विद्यार्थिनीला शरीरसुखाची मागणी करणारा शिक्षक अमित गणवीर याला अखेर निलंबित करण्यात आले आहे.
धरमपेठ शिक्षण संस्थेची कारवाई : नागपूर सुधार समितीचा मूकमोर्चा
नागपूर : धरमपेठ पॉलिटेक्निक कॉलेज येथील विद्यार्थिनीला शरीरसुखाची मागणी करणारा शिक्षक अमित गणवीर याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. धरमपेठ शिक्षण संस्थेतर्फे ही कारवाई करण्यात आली असून एकूण घटनेची चौकशी करण्याचे आश्वासनदेखील देण्यात आले आहे. दरम्यान, प्राध्यापकासोबत प्राचार्यांचेदेखील निलंबन करण्यात यावे, या मागणीसाठी नागपूर सुधार समितीतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला.
धरमपेठ पॉलिटेक्निक कॉलेज येथील शिक्षकाने एका विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केली. यानंतर या शिक्षकाला काळे फासण्यात आले होते. या मुद्यावरून राजकारणदेखील तापले. निलंबनाची कारवाई न केल्यास सोमवारपासून कॉलेजच्या समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा समितीचे प्रशांत पवार, नगरसेवक बंटी शेळके व पंजू तोतवानी यांनी दिला होता.
सोमवारी सकाळच्या सुमारास शंकरनगरस्थित धरमपेठ शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर समितीतर्फे मूकमोर्चा काढण्यात आले. या वेळी सर्व उपस्थित सदस्यांनी तोंडाला व डोळ्याला काळी पट्टी बांधून निषेध नोंदविला. संस्थेच्या संचालकांना यावेळी निवेदनदेखील देण्यात आले. संबंधित प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
यासंदर्भात धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर यांना विचारणा केली असता त्यांनी अमित गणवीर याच्यावर निलंबनाची कारवाई केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असेदेखील त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)
परीक्षा केंद्राची
मान्यता रद्द करा
दरम्यान, सुधार समितीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला व प्राचार्यांनादेखील निलंबित करण्याची मागणी केली. सोबतच धरमपेठ पॉलिटेक्निकची परीक्षा केंद्र म्हणून मान्यता रद्द करण्यात यावी. जर असे झाले नाही तर आणखी उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.