...तर वयाच्या २५ वर्षांपर्यंत मिळणार नाही लायसन्स

By सुमेध वाघमार | Published: November 20, 2024 03:54 PM2024-11-20T15:54:12+5:302024-11-20T15:56:18+5:30

परिवहन विभागाच्या सारथी प्रणालीत बदल : पुणे येथील पोर्शे कार अपघाताचा संदर्भ

...then the license will not be available till the age of 25 years | ...तर वयाच्या २५ वर्षांपर्यंत मिळणार नाही लायसन्स

...then the license will not be available till the age of 25 years

सुमेध वाघमारे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास त्याला वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत लायसन्स न देण्याचा कायदा आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणीच होत नव्हती. गुन्हा करूनही अल्पवयीन मुलांना लायसन्स मिळायचे. अखेर याची दखल परिवहन विभागाने घेतली. सारथी प्रणालीमध्ये नियमानुसार आवश्यक बदल करून घेतले. त्यामुळे आता अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास लर्निंग लायसन्सच निघणार नाही.


पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्शे या लक्झरी कारने दुचाकी चालवत असलेल्या दोघांना जोरदार धडक दिली, त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने देशाचे लक्ष वेधले होते. मोटार वाहन कायद्यातील अल्पवयीन वाहनचालकांच्या संदर्भातील कायद्याच्या प्रश्नचिन्ह अंमलबजावणीवरही उपस्थित झाले होते. विशेष म्हणजे, मोटार वाहन कायदा १९८९ च्या कलम १९९ अ (५) नुसार १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास मुलाचे पालक किंवा मोटार वाहनाचा मालक दोघांनाही दोषी मानले जाते. यात २५ हजारांचा दंडासह पालक किंवा मोटार वाहन मालकाला तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. तसेच अल्पवयीन मुलाला वयाच्या २५व्या वर्षापर्यंत वाहन परवाना न देण्याची तरतूद आहे. परंतु नागपुरात तरी या कायद्याची अंमलबजावणी केवळ दंडात्मक कारवाई पुरतीच मर्यादित राहायची. गुन्हा करूनही अनेकांना लायसन्स मिळायचे. याच्या तक्रारी झाल्याने अखेर परिवहन विभागाने पुणे येथील पोर्शे कारचा संदर्भ देत अल्पवयीन वाहन चालकांना वयाच्या २५व्या वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही यासाठी सारथी प्रणाली ४.० मध्ये आवश्यक बदल करण्याकरिता पुण्याचा राष्ट्रीय सूचना केंद्र यांना कळविले. 


आरटीओच्या कारवाईकडे लक्ष 
परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सोमवारी पत्राद्वारे प्रणालीत केलेल्या बदलांची माहिती दिली. वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांना परवाना प्राप्त होऊ नये याबाबत कारवाई करावी, असे निर्देशही दिले. त्यामुळे आरटीओच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.


अल्पवयीन मुलांच्या हाती का नको वाहने? 
चौदा ते सतरा वर्षे वयापर्यंत मुलांमध्ये आक्रमक वृत्ती असते. या वयात हार्मोनमध्ये बदल होत असतात. त्यामुळे काहीतरी थ्रिलिंग, अतिसाहस, इतरांपेक्षा थोडे वेगळे करण्याची इच्छा होत असते. हार्मोन आणि मनावरील कंट्रोल यांची सांगड घालता येत नसल्याने अघटित घडण्याची शक्यता असते. या वयात कायद्याची विशेष भीती नसते. आपल्या हातून चूक झाल्यास त्याला काहीच वाटत नसल्याने बेदरकार वृत्ती निर्माण होते. त्यामुळे अल्पवयीन मुलांना वाहन नकोच, असे मनोविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: ...then the license will not be available till the age of 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर