..तर इमामवाड्यात होईल ‘अक्कू’ची पुनरावृत्ती; गुन्हेगाराला कंटाळलेल्या महिलांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 10:32 PM2023-01-16T22:32:44+5:302023-01-16T22:33:09+5:30
Nagpur News गुन्हेगारांच्या त्रासाची माहिती पोलिसांना वारंवार देऊनदेखील काहीच नियंत्रण न आल्याने अखेर आम्हीच कायदा हाती घ्यावा का, असा सवाल इमामवाडा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत राहणाऱ्या शेकडो महिलांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
नागपूर : गुन्हेगारांच्या त्रासाची माहिती पोलिसांना वारंवार देऊनदेखील काहीच नियंत्रण न आल्याने अखेर आम्हीच कायदा हाती घ्यावा का, असा सवाल इमामवाडा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत राहणाऱ्या शेकडो महिलांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील जवादे यांच्या हत्येत सहभागी असलेल्या गुन्हेगारांची परिसरात दहशत वाढली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महिला तेथे काठी घेऊन टेहळणी करत असून, तेथे अक्कू यादव प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात महिलांनी सोमवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली व कैफियत मांडली. १४ जानेवारी रोजी सायंकाळी कुख्यात गुन्हेगार ऋषिकेश वानखेडे याने तीन साथीदारांच्या मदतीने साहिल लहाने यांच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली होती. नागरिकांचा जमाव जमल्याने ऋषिकेश व त्याच्या साथीदारांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांचे नुकसान करून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी ऋषिकेश आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. ऋषिकेशने दीड वर्षापूर्वी इमामवाड्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील जवादे यांची मित्रांच्या मदतीने हत्या केली होती, असा आरोप महिलांना केला आहे.
या प्रकरणातून बाहेर आल्यानंतर ऋषिकेश आणि त्याचे साथीदार इमामवाडा परिसरात दहशत निर्माण करत आहेत. अमलीपदार्थ विक्रीसह अनेक अवैध धंद्यात ते गुंतलेले असून, ते सुनील जवादेशी संबंधित लोकांना धमक्या देत आहेत. १४ जानेवारीच्या रात्री साहिलच्या घरावर हल्ला करून तोडफोड करतानाच गुन्हेगारांनी सुनील जवादे यांच्या राकेश पाटील यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. रविवारी रामबाग परिसरात नागरिकांनी पोलिस आणि गुन्हेगारांविरोधात घोषणाबाजी केली. ते इमामवाडा पोलिस ठाण्यालाही घेराव घालणार होते, मात्र कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने ते शांत झाले.
सोमवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी इमामवाडा पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांचीदेखील तक्रार केली. ते गुन्हेगारांबाबत मवाळ भूमिका घेत असून, परिसरात महिलांची छेडछाड, लूटमार, मारहाण, धमकावणे अशा घटना घडत आहेत, असा आरोप लावला. पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले.