...तर तीन महिन्यात महाराष्ट्रात ९ रेल्वे अपघात झाले असते! मध्य रेल्वेतील १० जणांचा पुरस्कार देऊन गौरव
By नरेश डोंगरे | Published: December 5, 2023 08:35 PM2023-12-05T20:35:36+5:302023-12-05T20:37:21+5:30
या सर्व १० कर्मचाऱ्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नागपूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
नागपूर : ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागात मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखविल्यामुळे ९ दुर्घटना टळल्या. तर, एका कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. या सर्व १० कर्मचाऱ्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नागपूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले विलास राजेश्वर चाैरे १५ ऑक्टोबर २०२३ ला चितोडा रेेल्वे स्थानकावर ड्युटी करीत होते. त्यांना या मार्गाने धावणाऱ्या एका मालगाडीच्या जीडीआरची तपासणी करताना दोन वॅगनचे बाह्य हेलिकल कॉईल स्प्रिंग तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी तेथेच थांबवून दुरूस्तीचे काम करून घेतले. त्यांच्या या कर्तव्य तत्परतेमुळे रेल्वेचा संभाव्य अपघात टळला.
विजेश सदाशिव हे आमला येथे ट्रॅकमन म्हणून सेवारत आहेत. २४ ऑगस्ट २०२३ ला कर्तव्यावर असताना त्यांना रुळाच्या वेल्डिंगला तडा गेल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली आणि त्यांच्या मार्फतीने ट्रॅकची दुरूस्ती करून घेतली. त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असते तर काही वेळेनंतर या ट्रॅकवरून जाणाऱ्या रेल्वेगाडीला अपघात झाला असता. मात्र, विजेश सदाशिव यांच्यामुळे तो संभाव्य अपघात टळला. २० नोव्हेंबर २०२३ रोजी मालगाडीचे इंजिन चालक अरुणकुमार सिंह यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे २० नोव्हेंबर २०२३ चा संभाव्य अपघात टळला.
त्याचप्रमाणे मुंबई विभागातील ईगतपूरीचे रेल्वे स्थानक उपव्यवस्थापक सीताराम कुमार, भायखळा येथील ट्रॅकमॅन चिदानंद आडोळे, कुर्ला कार शेड मुंबई येथील वरिष्ठ विभाग अभियंता दिनेश अनंतराम साखरे यांच्यामुळेही वेगवेगळ्या दुर्घटना टाळण्यास मदत झाली.
भुसावळ विभागातील कुंदनकुमार (ट्रॅकमन, माहेजी भुसावळ), मालगाडी इंजिन चालक महेंद्र सिंह (भुसावळ) आणि सोलापूर विभागातील सी. के. सिद्धेय (मालगाडी इंजिन चालक वाडी, सोलापूर) यांच्या प्रसंगावधानतेमुळेही वेगवेगळे अपघात टळले.
या सर्वांच्या कर्तव्य तत्परतेची दखल घेत त्यांना रेल्वेच्या महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने गाैरवान्वित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ५ डिसेंबरला आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्या हस्ते रोख, पदक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
भगवान विठ्ठल आंधळे बनले देवदूत!
सत्कारमुर्तीत आसनगाव, मुंबईचे की-मॅन भगवान विठ्ठल आंधळे यांचाही समावेश आहे. आसनगाव रेल्वे स्थानकावर २२ ऑक्टोबर २०२३ ला रात्री ७.३५ वाजता एका लहान मुलासह एक व्यक्ती धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढत होता. त्याचे संतुलन बिघडल्याने तो व्यक्ती फरफटत जाऊ लागला. भगवान आंधळे यांनी लगेच धाव घेत त्या व्यक्तीला पकडून ओढून घेतले. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचविले.