...तर कचरा संकलन कंपनीला भरावा लागेल दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:25 AM2020-12-13T04:25:59+5:302020-12-13T04:25:59+5:30
शहरालगतच्या भागात परिस्थिती गंभीर : रॅकिंग प्रभावित होण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील कचरा संकलन यंक्षणा संक्षम ...
शहरालगतच्या भागात परिस्थिती गंभीर : रॅकिंग प्रभावित होण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कचरा संकलन यंक्षणा संक्षम करण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये दोन कंपन्यांची नियुक्ती केली. मात्र वर्ष उलटले तरी कचरा संकलनात अपेक्षित सुधारणा झालेली नाही. सध्या २० ते २५ टक्के कचरा वेगवेगळा संकलित करून भांडेवाडी येथे नेला जातो. यामुळे स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरचे रॅकिंग प्रभावित होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता मनपाच्या आरोग्य विभागाने (घनकचरा) सुका आणि ओला कचरा वेगवेगळा संकलित न केल्यास कंपन्यांना दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याची सक्तीने अंमलबजावणी केली जाणार आहे.
शहरात दररोज १ हजार मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. यात २०० टन ओला तर ५० टन सुका कचरा वेगवेगळा संकलित करून भांडेवाडी येथे नेला जातो. वास्तविक कंपन्यांसोबत करण्यात आलेल्या करारानुसार वर्षभरात ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे अपेक्षित होते.
परंतु झोन १ ते ५ मधील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या ए.जी.एन्व्हायरो कंपनीने सुधारणा करण्याऐवजी लॉकडाऊनचा लाभ उठवत १२३ कर्मचाऱ्यांना घरी पाठविले. परिणामी या भागात दिवसाआड गाडी जाते. शहरालगतच्या भागातील परिस्थिती याहून गंभीर आहे. असे असतानाही झोन ६ ते १० ची जबाबदारी सांभाळणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या तुलनेत ए.जी.ला प्रतिटन १५० रुपये अधिक दिले जात आहे. या कंपनीला लाभ व्हावा, यासाठी करारातील अटी कंपनीच्या सोयीनुसार करण्यात आल्याचा आरोप आहे. बीव्हीजी कंपनीचे कामही समाधानकारक नाही.
....
कसे सुधारणार रॅकिंग
ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे अनिवार्य असताना, कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षी नागपूरचा १८ वा क्रमांक आला. दोन्ही कंपन्यांनी कामात सुधारणा न केल्यास रँकिंग माघारण्याची शक्यता आहे.
...
दंडाची रक्कम बिलातून कापणार
ओला व सुका कचरा संकलनाची जबाबदारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची आहे. यात यश न आल्यास दंड आकारून तो बिलातून कपात केला जाईल, याची सुरुवात केली आहे.
डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापक, मनपा