...तर आम्ही दोघेच २४-२४ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 10:33 AM2023-12-26T10:33:59+5:302023-12-26T10:36:05+5:30
देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, सर्व पक्षांनी या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे.
नागपूर- देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, सर्व पक्षांनी या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी अजुनही इंडिया आघाडीसोबत गेलेली नाही, त्यांच्यासोबत बोलणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पण वंचित आघाडीने शिनसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासोबत निवडणूक लढण्याचे जाहीर केले नाही. दरम्यान, आता वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनीलोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला सांगितला आहे.
"उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच आणि आमचे आधीच निवडणुकांबाबत ठरवून जाहीर केले होते. त्यात आम्ही असं ठरवलं होतं की,सेनेच काँग्रेस बरोबर, सेनेच एनसीपी बरोबर असं झालं नाही तर आमच्यामध्ये ५०-५० टक्के लढण्याचा निर्णय झाला होता. २४ जागा आम्ही २४ जागा ते लढणार असा मोगम अन्डस्टन्डींग झालं होतं पण त्यांच ठरल तर मग वेगळा फॉर्म्युला होऊ शकतो, असा फॉर्म्युला वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला.
२०२४ च्या लोकसभेत भाजपा 'इतक्या' जागा जिंकेल, दुसरा पर्याय नाही; नाना पाटेकरांचा दावा
स्वतंत्र लढण्याचीही तयारी ठेवावी लागेल
प्रकाश आंबेडकर म्हणाले, इंडिया आघाडीत आपण एकत्र लढलो तर स्वागतच आहे. जो कोणी उमेदवार असेल तो जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. अशी खूणगाठ मनाशी बांधा. ज्या पक्षाला पाठिंबा दिला असेल, त्या पक्षाच्या उमेदवाराला प्रत्येक बूथवर किमान ५०० मते मिळालीच पाहिजेत. यासाठी वाट्टेल ते करा. एकत्र आलो तर ठीक नाही तर स्वतंत्र लढण्याचीही तयारी ठेवावी लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.
आरक्षणाच्या नावाखाली राज्यात मराठा-ओबीसी व धनगर-आदिवासी यांच्यात वाद निर्माण केला जात आहे. सध्या देशात व राज्यात दबावाचे, दगाबाजीचे आणि ब्लॅकमेल करण्याचे राजकारण सुरू आहे. यातून पुन्हा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न आहे. ‘वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो’ काही गोष्टी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या चुकल्या तशा नागपूरकरांच्याही चुकल्या आहेत. घाबरता कशाला, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना दिला.