- तर मग तिकीट कशासाठी पाठविले?
By admin | Published: March 19, 2017 02:54 AM2017-03-19T02:54:49+5:302017-03-19T02:54:49+5:30
कोणतेही ठोस कारण न देता ऐनवेळी कार्यक्रम स्थगित करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर
येचुरींनी केली विद्यापीठाची ‘पोलखोल’ : चर्चेपासून दूर पळणे कुलगुरूंचा भ्याडपणा
नागपूर : कोणतेही ठोस कारण न देता ऐनवेळी कार्यक्रम स्थगित करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनावर कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार सीताराम येचुरी यांनी जोरदार हल्लाबोल केला. कार्यक्रमाची परवानगी घेतली नव्हती, असा कुलगुरूंनी कांगावा केला आहे. मग मला विमानाचे तिकीट कसे काय पाठविले, असा प्रश्न उपस्थित करीत येचुरी यांनी विद्यापीठाची पोलखोलच केली. कुलगुरूंचे वर्तन भ्याडपणाचे असल्याची त्यांनी टीका केली.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे १८ व १९ मार्च रोजी दीक्षांत सभागृहात ‘भारतीय लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सीताराम येचुरी यांना मुख्य वक्ते म्हणून बोलावण्यात आले होते व याच्या पत्रिका छापण्यात आल्या. मात्र अचानक हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे कुलगुरूंनी फर्मान काढले. कार्यक्रमाची प्रशासकीय पूर्वपरवानगी घेण्यात आली नाही, असा दावा कुलगुरूंनी केला होता.
शनिवारी त्याच विषयावर दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथील इतिहास विभागातर्फे येचुरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना व भाषणादरम्यान येचुरी यांनी विद्यापीठाचे वाभाडे काढले. कुलगुरूंच्या परवानगीनंतरच मला निमंत्रण मिळाले. इतकेच काय मला विमानाचे तिकीटदेखील पाठविण्यात आले. असे असताना अचानक व्याख्यान स्थगित करण्यात आले. जर पूर्वपरवानगी नव्हती तर मला तिकीट कसे काय पाठविले, असा प्रश्न येचुरी यांनी उपस्थित केला. नेमका कार्यक्रम का रद्द करण्यात आला, याचे उत्तर तर कुलगुरूच देऊ शकतील.
मात्र कुणाचा दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारे कारण न देता कार्यक्रम स्थगित करण्यामागे नक्कीच काही तरी गोम आहे, असे प्रतिपादन येचुरी यांनी केले.(प्रतिनिधी)