नागपुरात ‘घरकूल’साठी १८ हजार अर्जदार पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 09:58 PM2018-01-11T21:58:51+5:302018-01-11T22:01:09+5:30
पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत हक्काचे घरकूल मिळविण्यासाठी नागपुरातील तब्बल ७२ हजार नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केले होते. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे तसेच छाननीनंतर फक्त १८ हजार नागरिकांचे अर्ज पात्र ठरले आहेत. सुमारे ७५ टक्के अर्जदार घरकुलापासून वंचित राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत हक्काचे घरकूल मिळविण्यासाठी नागपुरातील तब्बल ७२ हजार नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केले होते. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे तसेच छाननीनंतर फक्त १८ हजार नागरिकांचे अर्ज पात्र ठरले आहेत. सुमारे ७५ टक्के अर्जदार घरकुलापासून वंचित राहणार आहेत.
पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत नासुप्र घरे बांधणार आहे. महापालिकेत अर्ज करणाऱ्या पात्र नागरिकांना नासुप्र आणि म्हाडा घरे देणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी सांगितले. कंपनीने या नागरिकांची तपासणी केल्यानंतर घरकूल योजनेसंदर्भातील डीपीआर राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान घरकूल योजनेतील निकषाप्रमाणे आलेल्या ७२ हजार अर्जांपैकी ४२ हजार नागरिकांनी आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्रे सादर केली होती. यातील १८ हजार नागरिक पात्र ठरले असून, त्यांची आता महापालिकेतर्फे तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी मे. आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या कंपनीची निविदा गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे. या कंपनीला प्रति नागरिक १४८ रुपये शुल्क दिले जाणार आहे. महापालिका एकूण २६ लाख ६४ हजार रुपये या कंपनीला देणार आहे. परंतु या कंपनीने किती कालावधीत तपासणीचे काम करावे, याबाबत कुठलीही स्पष्टता नाही.