चार महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येची शंभरी पार, आरोग्य यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 02:30 PM2022-07-04T14:30:46+5:302022-07-04T14:32:58+5:30
सध्या शहरात कोरोनाचे ३६० तर ग्रामीणमध्ये १५५ असे ५१५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील सात रुग्णांवर मेडिकलमध्ये तर उर्वरित सहा रुग्णांवर विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
नागपूर : फेब्रुवारी महिन्यात तिसरी लाट ओसरल्यानंतर कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने रविवारी शंभरी ओलांडली. चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच १०५ रुग्णांची नोंद झाली, तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५१५ वर गेली. बाधितांची एकूण संख्या ५ लाख ७९ हजार ३०५ झाली असून, मृतांची संख्या १० हजार ३३९ वर पोहोचली आहे.
नागपूर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तिसरी लाट आली. १९ फेब्रुवारी रोजी १४० रुग्णांची नोंद होती. त्यानंतर पुढे रुग्णसंख्येने शंभरी गाठलीच नाही. मात्र जून महिन्यापासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २३ जून रोजी ९५ रुग्णसंख्या नोंदविली गेली. त्यानंतर आज शहरात ८० तर, ग्रामीणमध्ये २५ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
- पॉझिटिव्हीटीचा दर ६ टक्क्यांवर
मागील चोवीस तासांत शहर व ग्रामीण मिळून १ हजार ८१४ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत रविवारचा पॉझिटिव्हीटीचा दर सहा टक्क्यांवर गेला आहे. मागील सहा दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या ५०वर असल्याने चिंता वाढली आहे. या महिन्यात रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
- ५०२ रुग्ण गृहविलगीकरणात
सध्या शहरात कोरोनाचे ३६० तर ग्रामीणमध्ये १५५ असे ५१५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील सात रुग्णांवर मेडिकलमध्ये तर उर्वरित सहा रुग्णांवर विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ५०२ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. आज ५८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ५ लाख ६८ हजार ४५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
-कोरोनाची वाढती संख्या
२८ जून : ६५ रुग्ण
२९ जून : ६२ रुग्ण
३० जून : ७४ रुग्ण
१ जुलै : ८० रुग्ण
२ जुलै : ९५ रुग्ण
३ जुलै : १०५ रुग्ण