बारावीच्या परीक्षेचे अनेक पर्याय उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:58+5:302021-05-16T04:08:58+5:30
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अजूनपर्यंत कुठलीही घोषणा केली नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे व तिसऱ्या लाटेबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून ...
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अजूनपर्यंत कुठलीही घोषणा केली नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे व तिसऱ्या लाटेबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिल्या गेलेल्या अलर्टनुसार बारावीच्या परीक्षेबाबत साशंकताच आहे. लोकमतने यासंदर्भात शहरातील शिक्षकांकडून मते जाणून घेतली. त्यांचे म्हणणे आहे की बोर्डाने परीक्षेबाबत लवकर निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत आहे. बोर्डाने ठरविल्यास परीक्षा घेण्यासाठी दुसरेही पर्याय उपलब्ध आहेत.
- ५०-५० चा फाॅर्म्युला
सरकार व बोर्ड जर परीक्षेचे आयोजन करीत असेल तर ५०-५० चा फाॅर्म्युला उत्तम आहे. या फाॅर्म्युल्यानुसार ५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी व ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करावे. प्रश्नांच्या संख्येनुसार वेळ निर्धारित करावा. या फाॅर्म्युल्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अधिक वेळ थांबावे लागणार नाही.
आशनारायण तिवारी, प्राचार्य, श्रीमती सी.बी.आदर्श विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज, गांधीबाग
- आंतरिक मूल्यमापनावर घोषित करू शकतात निकाल
राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. जून ते जुलैमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशात बोर्डाच्या परीक्षेचे आयोजन करणे अशक्य आहे. सरकारने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. बारावीची सुद्धा रद्द केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांचा निकाल आंतरिक मूल्यमापनावर घोषित केला जाऊ शकतो.
हर्षद घाटोले, शिक्षक, जी.एस. कॉमर्स कॉलेज
- परीक्षा ऑफलाईनच झाली पाहिजे
सद्यस्थितीत बारावीच्या लेखी परीक्षेचे आयोजन करणे शक्य नाही. पण ऑनलाईन परीक्षेचे आयोजन सुद्धा कठीणच आहे. त्यामुळे बोर्डाने वेट अॅण्ड वॉचची भूमिका घ्यावी. परिस्थिती सामान्य झाल्यावर परीक्षा घ्यावी. परीक्षा ऑफलाईनच व्हायला हवी.
नीलम सोनवानी, श्री गणपती ज्युनिअर कॉलेज, पारडी
- एक पेपर दोन शिफ्टमध्ये व्हावा
बोर्डाने बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या फॉर्म्युल्याच्या आधारे परीक्षा घ्यावी. एकाच विषयाचे दोन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तयार कराव्यात. प्रश्नपत्रिकेत ५० बहुपर्यायी प्रश्न असावेत. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असावा. त्यामुळे एका विषयाचा पेपर दोन शिफ्टमध्ये घेतला जाऊ शकतो. त्यामुळे केंद्रावर गर्दी होणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होईल.
डॉ. राजेश पशीने, शिक्षक, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय