औषधांच्या स्ट्रीपमध्ये गोळ्याच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:06 AM2018-04-21T01:06:02+5:302018-04-21T01:06:14+5:30
डॉक्टरांनी एखाद्या आजारासाठी लिहून दिलेल्या औषध स्ट्रीपच्या (१० गोळ्या) स्वरुपात रुग्णाने घरी नेल्यानंतर त्यात गोळ्याच नसल्यास रुग्णांना कसा मनस्ताप होतो, याचा प्रत्यक्ष एका नागरिकाला आला. त्यांना गुरुवारी रात्री आणि सकाळी औषधाविना राहावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉक्टरांनी एखाद्या आजारासाठी लिहून दिलेल्या औषध स्ट्रीपच्या (१० गोळ्या) स्वरुपात रुग्णाने घरी नेल्यानंतर त्यात गोळ्याच नसल्यास रुग्णांना कसा मनस्ताप होतो, याचा प्रत्यक्ष एका नागरिकाला आला. त्यांना गुरुवारी रात्री आणि सकाळी औषधाविना राहावे लागले.
प्राप्त माहितीनुसार, एका नागरिकाने मुंबईतील ज्युपिटर बायोलॅब प्रा.लि. कंपनीच्या अॅसिडिटी आजारावरील ‘ज्युपिसिड-४०’ या १० गोळ्यांच्या तीन स्ट्रीप (एक स्ट्रीप १० गोळ्या) आणि सोबतच अन्य अशी एकूण १०२९ रुपये किमतीची औषधे गुरुवारी सदर येथील एका फार्मसीतून खरेदी केली. फार्मसिस्टवर विश्वास ठेवून त्यांनी ही औषधे घरी नेली. औषध सेवन करण्याची वेळ झाली तेव्हा पॅक स्ट्रीपमध्ये एकही गोळी नव्हती. रात्र झाल्याने फार्मसीमध्ये परत जाणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांना औषधाविना राहावे लागले. गोळी न घेतल्यामुळे अॅसिडिटीचा त्रास रात्री आणि सकाळी उद्भवला. अॅसिडिटीची गोळी असल्यामुळे सहन केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारात फार्मसिस्टचा काहीही दोष नाही. उत्पादक ते वितरक आणि विक्रेत्यांच्या माध्यमातून विकण्यात येणाऱ्या गोळ्या रुग्णांपर्यंत पोहोचतात. रुग्ण औषधे खरेदी करताना स्ट्रीमध्ये गोळ्या आहेत की नाही हे तपासून पाहात नाहीत. पण असा प्रकार घडल्यानंतर रुग्ण थेट फार्मसिस्टला दोष देतो. हा प्रकार रुग्णांना मनस्ताप देणारा आहे. अशा प्रकारासाठी कंपनीची थेट चौकशी करावी, अशी मागणी नागरिकाने लोकमतशी बोलताना केली.